भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे येथे रंगला कुस्त्यांचा हंगामा

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी-
भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे (ता. पारनेर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचा हंगामा रंगला होता. लाल मातीत रंगतदार कुस्त्यांचा थरार ग्रामस्थांना अनुभवयास मिळाला. या कुस्ती हगाम्यात निमगाव वाघा (ता. नगर) चे पै. संदिप डोंगरे विरुध्द काकणेवाडी (ता. पारनेर) चे पै. सार्थक वाळुंज यांची कुस्ती प्रेक्षणीय ठरली.
डोंगरे व वाळुंज यांच्यात दहा ते पंधरा मिनीटे कुस्ती रंगली होती. दोन्ही मल्ल तुल्यबळ असल्याने डाव-प्रतिडावानंतरही ही कुस्ती अनिर्णित राहिली. दोन्ही मल्लांची कुस्ती ग्रामस्थांनी बरोबरीत सोडवून प्रेक्षणीय कुस्ती केल्याबद्दल दोन्ही मल्लांना रोख बक्षिस देऊन अभिनंदन केले.
कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेल्या नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा वाळवणे ग्रामस्थांच्या वतीने या कुस्ती हगाम्यात सत्कार करण्यात आला.यावेळी पंच संतोष पठारे, सागर पठारे, सदाशीव पठारे, रामदास काळे, पै. आकाश पठारे, पै. सचिन पठारे, पै. गणेश फलके, पै. सोनू डोंगरे आदी उपस्थित होते.