मळगंगा ट्रस्टचे नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ बरखास्त ….

दत्ता ठुबे
पारनेर : पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे . धर्मादाय उपायुक्त अहमदनगर यांचे न्यायालयाने हा निकाल नुकताच दिला . याबाबत सविस्तर माहिती अशी की , या देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची मुदत २०२२ मध्ये संपली होती पुढील व्यवस्थापन मंडळ निवडीच्या वेळी सभासदांना विश्वासात न घेता , गावातील पाच नागरीकांची पंच समिती नेमुन त्यांनी सुचविलेल्या नावांची विश्वस्त म्हणून निवड केली होती. परंतु विश्वस्त निवडीच्या या बेकायदेशीर पद्धतीवर निघोज येथील मंगेश वराळ ,दत्तात्रय भुकन व बबन कवाद यांनी आक्षेप घेतला व धर्मादाय उप – आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीत विश्वस्त निवडीत पंच कमिटीने घराणेशाही , एकाधिकारशाहीचा वापर करत मनमानी केल्याचा आरोप केला होता . तसेच ट्रस्टच्या घटनेत विश्वस्त निवडीविषयी अशी तरतुद नाही म्हणून असे घटनाबाह्य निवडलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती . त्यावर धर्मादाय न्यायालयाने नवनिर्वाचित विश्वस्त व पंच कमिटीला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते . परंतु त्यांना अनेक वेळा संधी देवूनही काहीच म्हणणे सादर न केल्यामुळे धर्मादाय उपायुक्त न्यायालयाचे पिटासन अधिकारी श्रीमती यु . एस . पाटील यांनी नवनिर्वाचित विश्वस्त मंडळ बेकायदेशीर घोषित केले .
या निर्णयामुळे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या नवनिर्वाचित प्रभाकर कवाद ,शांताराम लंके ,ज्ञानदेव लंके ,शांताराम कळसकर , शिवाजी वराळ ,बाळासाहेब लामखडे , रामदास वरखडे , वसंत कवाद ,अमृता रसाळ , शंकर लामखडे , लक्ष्मण ढवळे रामदास ससाने मंगेश लंके , ज्ञानेश्वर वरखडे ,बजरंग वराळ ,संतोष रसाळ , दिलीप लाळगे ,गौतम तनपुरे , भास्कर वराळ , दिलीप ढवण , मनोहर राऊत यांचे विश्वस्त मंडळ बरखास्त झाले .
◼️ निकालावर समाधानी …
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट मध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून घराणेशाही व एकाधिकारशाहीतुन मनमानी कारभार चालू होता वर्षानुवर्षे तेच – तेच पदाधिकारी पदांना चिटकून होते त्यामुळे सर्वसामान्य नागरीक , महीला व युवकांना ट्रस्ट मध्ये काम करण्याची संधी दिली जात नव्हती .
या निकालामुळे ट्रस्टमधील चाळीस वर्षांच्या मनमानी कारभाराला चपराक बसली आहे . पुढील ट्रस्ट निवडीत महिला , युवक व नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची आमची मागणी कायम आहे या निकालावर आम्ही समाधानी आहोत.
- मंगेश वराळ, दत्तात्रय भुकन