अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल होणार, शिक्षण विभागाकडून आदेश जारी

मुंबई दि 29
मुंबईसह राज्यात सरकारची कोणतीही मान्यता न घेता अनधिकृतपणे सुरू असलेल्या बोगस शाळांवर आजपासून गुन्हे दाखल होणार आहेत. मुंबई विभागातील बोगस शाळांवर कारवाई करण्यासाठी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी आदेश जारी केले.
मुंबईसह राज्यात केंद्रीय मंडळाच्या नावाने 800 हून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू असून त्याची गंभीर दखल काही दिवसांपूर्वी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेत त्यांच्यावर कारवाई सुरू केली होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या शाळांच्या वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या अनधिकृत शाळा आहेत, त्या सर्व शाळा 30 एप्रिलअखेर बंद करून तसा अहवाल सादर करण्यासाठी आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी मुंबई विभागातील अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी तसेच त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी आदेश जारी केले आहेत. यादरम्यान, ज्या अनधिकृत शाळांकडून शासनास प्रदान केलेल्या रकमेचे चलन, दंड भरत नसलेल्या शाळांचा सातबारा उतारा, मालमत्ता पत्रक आणि मान्यताप्राप्त शाळेत समायोजित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणित यादी इत्यादी कागदपत्रे पुरावा स्वरूपात सादर केल्यास त्याचे ना-हरकत प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र इत्यादी तपासणी करून त्यांना मुभा दिली जाणार आहे.