नगर- पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे अखेर बस थांबा सुरू !

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे नव्याने विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या तसेच परीसरातील वयोवृद्ध नागरिक, शाळेतील विद्यार्थी यासह प्रवाशांसाठी नगर- पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे बस थांबा सुरू करावा अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश कुलथे यांनी केली होती.या मागणीला अखेर यश आले असून सर्व एसटी बस म्हसणे फाटा येथे थांबा घेऊन कामगार, विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे पत्र सर्व आगार प्रमुखांना देण्यात आले आहे.
म्हसणे फाटा येथे बस थांबा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर जन आक्रोशचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश कुलथे यांनी मुंबई येथील वाहतूक शाखेचे महाव्यवस्थापक यांना निवेदन देऊन म्हसणे फाटा येथे बस थांबा करण्यात यावा अशी मागणी केली होती. कुलथे यांच्या या मागणीला अखेर यश मिळाले असून म्हसणे फाटा येथे सर्व एसटी बस थांबा सुरू होणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नगर- पुणे महामार्गावर म्हसणे फाटा सुमारे दहा ते बारा गावांचा केंद्रबिंदू आहे. नगर, पुणे यासह इतर ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी यावे लागते परंतु म्हसणे फाटा येथे बस थांबत नसल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा आधार घेऊन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. बस थांबत नसल्याने रात्री अपरात्री नागरिकांसह महीला प्रवाशांना तासंतास ताटकाळत बसावे लागत होते. मात्र कुलथे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून म्हसणे फाटा येथे बस थांबा मंजूर केल्याबद्दल नागरिकांसह प्रवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.
…