पारनेर तालुक्यात रस्ते अपघात वाढले! गतिरोधक बसवा-रुपेश ढवण

दत्ता ठुबे/पारनेरप्रतिनिधी :
पारनेर तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढत आहे देवीभोयरे फाटा ते गव्हाणवाडी या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असून गतिरोधक बसवावा अशी मागणी निघोज येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवण यांनी निवेदन देऊन केली आहे.
निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की देवीभोयरे फाटा ते गव्हाणवाडी हा रस्ता गेली तीन वर्षात तयार झाला असून हा रस्ता जास्त वाहतूकीचा आहे. गेली तीन वर्षात या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. प्रामुख्याने दुचाकी वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात झाले असून यामध्ये बहुसंख्य दुचाकी चालक जखमी किंवा मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. विशेष करून शिरूर आळेफाटा हा रस्ता अत्यंत महत्वपूर्ण आहे. दूध उत्पादक, शाळेचे विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी, अशा प्रकारे असंख्य लोक या रस्त्याचा दैनंदिन वापर करीत आहेत.
गेल्या दोन ते दिवसांत या रस्त्यावर विशेष करून निघोज जवळा राळेगण थेरपाळ या परिसरातील अपघातात तीन व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी रुंदीकरण आवश्यक आहे. त्या ठिकाणी रुंदीकरण करण्यात यावे तसेच आवश्यक तेथे गतिरोधक बसविण्याची मागणी लक्षात घेऊन तातडीने हे कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा आम्ही या भागातील ग्रामस्थ म्हणून करीत आहेत. कृपया आमच्या मागणीकडे तातडीने लक्ष देउन येत्या पंधरा दिवसांत ही मागणी मान्य करुन काम तातडीने सुरू करावे अन्यथा या भागातील ग्रामस्थ आंदोलन करतील व या आंदोलनाची जबाबदारी आपल्या विभागाची राहील असे बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनामध्ये निघोज येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवण यांनी सांगितले आहे.