आदिवासी टोकरे कोळी वधु-वर परिचय मेळावा थाटात संपन्न

नाशिक दि १७
नाशिक जिल्हा कोळी समाज विकास मंचच्या माध्यमातून रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी श्री वाल्मिक ऋषी मंदिर हॉटेल पार्थ मागे,श्रमिक नगर सातपूर जिल्हा नाशिक येथे आदिवासी टोकरे कोळी वधु-वर परिचय मेळावा थाटात संपन्न झाला.
आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानानुसार ४७ जमाती आदिवासी साठी पात्र आहेत.महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक २८,२९ व ३०वर असलेल्या कोळी, ढोर, टोकरे कोळी,कोळी महादेव, डोंगर कोळी,कोळी मल्हार डॉ.बाबासाहेबांच्या संविधानानुसार या जमाती आदिवासींमध्ये मोडतात. आदिवासी म्हणजे देशातील प्रथमचे रहिवासी,मूळ रहिवासी,मूळ भूमिपुत्र, जंगल,जमीन पाणी यांचे मूळ मालक असल्यामुळे ब्रिटिश शासनाने मुंबई ॲक्ट(३)१८७४ मध्ये प्रत्येक गावी आदिवासी जागले,हलके गाव कामगार म्हणून नेमणुका केल्या होत्या.त्याचा मोबदला म्हणून त्यांना हलके वतन म्हणजे इनाम वर्ग ६ ब जमिनी देण्यात आलेल्या आहेत.या जमिनींना खानदेशात आदिवासी कोळी इनाम (कोयी इनाम)असेही म्हणतात.या जमिनीची खरेदी विक्री होत नाही.ते सात बारावरच आदिवासी आहेत.तरी आदिवासींना जातीचे व वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही म्हणून विद्यार्थी शिक्षणापासून,नोकरीपासून वंचित झाले आहेत हा संविधानाचा घोर अपमान आहे.
वधू-वरांची कुंडली काढत बसू नका.एकाचेही लग्न वेळेवर लागत नाही.मग कुंडली काढून उपयोग काय? पूर्वी सर्वांच्या जन्मतारखा १/६ प्रमाणे खोट्या आहेत, एकाचीही कुंडली काढलेली नाही.ज्यांच्या जन्मतारखा खोट्या आहेत तेच त्यांच्या मुला मुलींची कुंडली काढत फिरतात व उच्चशिक्षित मुला मुलींना नाकारतात.मग तुमच्या शिक्षणाचा व पदाचा काय उपयोग?हे दुर्भाग्य आहे.पूर्वीच्या लोकांची कुंडली नसताना सर्वांना मुलं बाळ झाली.हुंडा देणे घेणे बंद करा.नारळ वाटी लावणे बंद करा.वधू-वरांचे ३६ गुण पाहण्यापेक्षा त्यांचे शिक्षण,वर्तन,चांगली नियत,प्रामाणिकपणा,मेहनती पणा इत्यादी गुण बघा. इमानदार व प्रामाणिक लोक लग्न जोडण्याचे काम करतात मोडण्याचे पाप करत नाही.इमानदार व प्रामाणिक लोक मंडपवर येल रायना ते चढू द्या. (लग्न जमत असेल तर जमू द्या)असे म्हणतात व तसे प्रयत्नही करतात.
काही लबाड लोक वधू-वरांची चुकीची व खोटी माहिती देऊन,लग्न मोडतात.त्या वधू-वरांना त्यांनी पाहिलेलं पण नसतं.त्यांनी बुद्धिबळाचा खेळ शिकायला पाहिजे.कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या माणसाचे नुकसान करत नाही. दुसऱ्याच्या मुला मुलींचे लग्न जमविणे हेच खरे शिक्षण आहे.
पूर्वीचे लोक मुलींना फारसे शिकवायचे नाही.म्हणून मुला मुलींमध्ये कमीत कमी पाच-सात वर्षाचे अंतर असायचे.आता मुली शिकायला लागल्या. ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट व्हायला लागल्या.नोकरी करायला लागल्या.मुला मुलींचे वय नैसर्गिक रित्या वाढणारच,सारखे असणारच.मुलगी पाच वर्षांनी लहानच पाहिजे असा अट्टाहास करू नका.मुला मुलींचे सारखे वय असेल तरी लग्न करायला काही हरकत नाही.
या कार्यक्रमाचे आयोजन नारायण कोळी साकरीकर,कमलेश रायसिंग,निलेश सैंदाणे,प्रकाश कोळी,ज्ञानेश्वर सोनवणे,उल्हास सोनवणे, नितीन कोळी,जीवन सोनवणे,विकास सपकाळे,कु. शितल कोळी,कल्पना सोनवणे, राहुल कोळी,नितीन शेवरे,संजय सोनवणे,सुरेश निकम,नाना मोरे, युवराज सैंदाणे,अशोक सोनवणे, संजय शिंदे,विजय वाकडे,सुरेश नवसारे,गणेश कुवर,किसन सोनवणे,सुदाम चव्हाण,मधुकर शेवरे प्रमुख अतिथी म्हणून मा. खासदार भास्करराव भगरे,महसूल आयुक्त प्रवीण जी देवरे,कविता कोळी,आदिवासी विकास संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे,राजहंस टपके,देवानंद भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोपाल कोळी, पीएसआय भगवान कोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.