शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी त्रिसदस्यीय समितीचा संयुक्त पिक पहाणी अहवाल सादर करावा -सभापती श्री. बाबासाहेब तरटे

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
शासनाने माहे १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३५०/- रु. प्रमाणे कांदा अनुदान जाहीर केलेले असुन त्याकरीता पारनेर बाजार समितीमध्ये विहीत नमुन्यात अर्ज शेतकऱ्यांनी दाखल केलेले आहेत. परंतु सदर अर्जा मधील ७/१२ उताऱ्यावरील अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे हस्तलिखीत नोंदी असुन काही शेतकऱ्यांचे रब्बी, उन्हाळ हंगामातील नोंदी आहेत. कांदा अनुदानासाठी सन २०२२-२३ या सालाची लेट खरीप कांदा पिकाची पीक नोंद असणे आवश्यक आहे व फक्त ई-पीक पहाणी केलेल्या शेतकरी त्यासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचीत राहणार आहेत. यावर शासनाकडे मा.आ. निलेशजी लंके साहेब यांचे मार्फत पत्रव्यवहार करणेत येवून सदर अट शिथील करण्याची मागणी करणेत आली होती.
शासनाने यावर विचार करुण कांदा अनुदानासाठी प्रत्येक गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची त्रिसदसीय समिती गठीत केलेली आहे. सदर त्रिसदस्यीय समितीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची खरीप कांदा पीक लागवडीची खात्री करुन तसा स्पष्ट अहवाल सादर करावयाचा आहे. त्याचा विहीत नमुण्यातील अर्ज बाजार समितीकडे उपलब्ध असुन शेतकऱ्यांनी सदर अर्जावर स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांचा संयुक्त पाहणी अहवाल, गट नंबर, खाते नंबर खरीप हंगाम कांदा पीकाचे क्षेत्र नमूद करुन संयुक्त स्वाक्षरीने बाजार समितीकडे सादर करावा. सोबत कांदा अनुदान अर्ज केल्याची पोहच पावती वरील बँकेचे नाव व अर्जाचा नंबर नमुद करणे आवश्यक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सदर त्रिसदसीय समितीचा संयुक्त पीक पहाणी अहवाल बाजार समिती मुख्य कार्यालय पारनेर येथे सादर करावा असे आवाहन सभापती श्री. बाबासाहेब तरटे, उपसभापती श्री. भाऊसाहेब शिर्के व सर्व संचालक मंडळाने केले आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा फक्त बाजार समितीमध्ये विक्री करावा. खाजगी व्यापारी अथवा शेतावर विक्री करु नये. कारण खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या कांदा उत्पादकांनाच कांदा अनुदानाचा फायदा होणार आहे.