अहमदनगर

संताच्या विचारातील शिक्षण विषयक दृष्टीकोन जाणून घेण्याची गरज -शिवाजीराव तांबे

शिक्षणाचे पसायदान ’ या पुस्तकाच्या

दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

संगमनेर- प्रतिनिधी
शिक्षणाचा मूल्याधिष्ठीत विचार हा संत साहित्यात सातत्याने प्रतिबिंबीत झाला आहे.समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी शिक्षणाची गरज आहे.मात्र शिक्षण अधिकाधिक मूल्याधिष्ठीत होण्यासाठी संताच्या विचारातील शिक्षण विषयक दृष्टीकोन जाणून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक शिवाजीराव तांबे यांनी केले.

चपराक प्रकाशनाच्या वतीने संदीप वाकचौरे लिखित ‘ शिक्षणाचे पसायदान ’ या पुस्तकाच्या व्दितीय आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी राज्य शासनाचा कंठ संगीत पुरस्कार विजेते जेष्ठ संगीतकार कल्याणजी गायकवाड,महाराष्ट्रातील सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड,माजी शिक्षण उपसंचालक मकरंदजी गोंधळी,चपराक प्रकाशनाचे प्रमुख जेष्ठ संपादक घनश्यामजी पाटील,रवींद्र कामठे,अरूण कमळापूरकर,आळंदी देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी उमेश बागडे,संस्थानचे ह.भ.प.तुकाराम महाराज ,लेखक संदीप वाकचौरे उपस्थित होते.
तांबे आपल्या भाषणात म्हणाले की, शिक्षण हे समाज व राष्ट्र परिवर्तनाचे साधन आहे.समाजाची उन्नत्ती आणि उत्थान शिक्षणातून घडण्याची शक्यता अधिक आहे.त्यामुळे शिक्षणाचा खरा विचार आणि दृष्टीकोन समाजमनापर्यंत पोहचला तर अधिक वेगाने समाजात बदल घडू शकेल.शिक्षणाच्या पसायदान या पुस्तकातून संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत वर्तमानात शिक्षण विषयक मांडले जाणारे तत्वज्ञान शोधून प्रभावी मांडणी करण्याचे काम लेखकाने केले आहे.पुस्तकातील आशय अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आहे.त्यामुळे शिक्षणावरील आणि संत साहित्याशी नाते सांगणारी पुस्तकाची आवृत्ती अवघ्या पंधरा दिवसात संपली आहे.संत साहित्यात शिक्षणाचा विचार आहेच ,मात्र तो अधिक सुलभतेने वाचकांच्यासमोर मांडण्याचे काम लेखकाने केले आहे.संत परंपरेतील दृष्टांत,विविध उदाहरणे आणि अधिक सुलभ भाषा यामुळे पुस्तक शिक्षण क्षेत्रात कार्यरत नसलेल्यांना देखील सहजतेने समजून घेण्यास मदत झाली आहे.शिक्षणाचे पसायदान हे पुस्तक नवा विचार आणि दृष्टीकोन देण्यास मदत करेल असे मत त्यांनी व्यक्त केले.कल्याणजी गायकवाड यांनी संताच्या साहित्यातील नेमका विचार शोधून शिक्षण तत्वज्ञानाशी नाते सांगत केलेली मांडणी अधिक महत्वाची आहे.शिक्षण हा विचार संत साहित्यात आहे आणि तो वर्तमानातील शिक्षण प्रक्रियेला महत्वाची दृष्टी देतो ही मांडणी मनाला प्रभावित करणारी असल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकात चपराकचे घनश्याम पाटील यांनी शिक्षणावरील पुस्तकांच्या संदर्भाने प्रकाशनाची मनोभूमिका विषद करताना सांगितले की,संदीप वाकचौरे यांचे शिक्षणावरील बारा पुस्तके वर्षभरात प्रकाशित करण्यात येणार आहे.पुस्तकाला चांगली मागणी वाचकांकडून होत आहे.ही पुस्तके वाचकांना शिक्षण दृष्टी देण्यास आणि शिक्षणाचा गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडतात असे मत व्यक्त केले.यावेळी संदीप वाकचौरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button