नाशिक शहरात रोटरी चौक’चे शानदार लोकार्पण;

नाशिक : शहरातील मध्यवर्ती ठक्कर बस स्थानकासमोर रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या पुढाकाराने तसेच नाशिक महानगरपालिका आणि एबीएच डेव्हलपर्सच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या चौकाचे शनिवारी सायंकाळी रोटरीचे प्रांतपाल आनंद झुनझुनूवाला आणि माजी महापौर अशोक मुर्तडक, एबीएचचे मोहनलाल बागमार, अध्यक्ष प्रफुल बरडीया यांच्या हस्ते उत्साही वातावरणात लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी रोटरीचे मनोनीत प्रांतपाल आशा वेणुगोपाल, एबीएच डेव्हलपर्सचे संचालक धर्मपाल हंसवाणी, यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी रमेश मेहेर, राजिंदर खुराणा, नाना शेवाळे, डॉ. के. सुंदरराजन, महेश मोकालकर, राजेंद्र भामरे, रणजीत साळवी, सलीम बटाडा, आर्किटेक केदार देवी, अनिल सुकेनकर, विजय दिनानी, सचिव ओमप्रकाश रावत, आदी उपस्थित होते. या चौकामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. संस्थेच्या गेल्या ७८ वर्षांच्या कारकिर्दीत हा उपक्रम नाशिककर आणि या शहरात येणाऱ्या प्रत्येकाच्या पसंतीस उतरेल अशा आशावाद डॉ. आनंद झुनझुनुवाला यांनी व्यक्त केला. नाशिक रोटरी क्लबचा हा रोटरी चौक उपक्रम रोटरी संस्थेच्या राज्यातील इतर क्लबसाठी आदर्शवत ठरेल असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

– फ्रावशी इंटरॅक्ट क्लबची सामाजिक बांधिलकी
रोटरी क्लबच्या इंटरॅक्ट क्लब ऑफ फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विंजित टेक्नॉलॉजी या कंपनीकडून एक लाख रुपयांचा सीएसआर फंड मिळवला. या फंडाच्या माध्यमातून त्यांनी दुगाव व गालोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुमारे ३ हजार पुस्तके दिली. तसेच उर्वरित रकमेतून नाशिक शहरात गर्दीच्या योग्य त्या ठिकाणी कचरा डबे लावणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या कामाची दखल घेत रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झूनझूनवाला यांच्या हस्ते इंटरॅक्ट पदाधिकारी रीना मल्होत्रा व इतर इंटरॅक्ट सदस्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी इंटरॅक्ट संचालक सुचेता महादेवकर आणि कीर्ती टाक उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथ डायरेक्टर निलेश सोनजे, मंथ लीडर अस्मिता मोरे, सोनल कोटकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. सचिव ओमप्रकाश रावत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
