कासारे गावात परदेशी पाहुण्यांची भेट; पाणलोट कामांची केली पाहणी

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कासारे या गावात गुरुवार दि. ८ जून रोजी लिथुआनिया देशाचे भारतातील राजदूत मिसेस डायना व डॉ. सारा अहमद यांनी सदिच्छा भेट दिली व कासारे गावाने पाणी व्यवस्थापनावर केलेल्या कामाची पाहणी केली.
यावेळी कासारेकरांनी परदेशी पाहुण्यांचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात केले. संपूर्ण गावातून मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. जि. प. प्राथमिक शाळा कासारे येथील विद्यार्थ्यांनी यावेळी लेझीमवर ठेका धरला. स्वागतासाठी गावातील महिला व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. उषा निमसे व मीरा निमसे यांनी स्वागत गीत सादर केले. उत्साह पूर्ण वातावरणात झालेले स्वागत पाहून मिसेस डायना व डॉ. सारा अहमद या भारावून गेल्या.
यावेळी कासारे गावचे उपक्रमशील आदर्श सरपंच शिवाजीराव निमसे व ग्रामस्थांनी मिसेस डायना व डॉ. सारा अहमद यांना कासारे गावची ओळख करून देताना सोशल सेंटरच्या माध्यमातून गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाची झालेली कामे वृक्ष संवर्धनातून गावात झालेला बदल या संदर्भात योग्य ती निवडक माहिती दिली.
दरम्यान यावेळी माहिती देताना कासारे येथे पाणलोट क्षेत्र विकासाच्या संदर्भात झालेली कामे, पाणी व्यवस्थापनावर कासारे ग्रामपंचायत करत असलेले काम, वृक्ष संवर्धन व वृक्षरोपण यामुळे गावात होत असलेला बदल तसेच सोशल सेंटरच्या माध्यमातून १९८४ पासून गावात झालेली कामे ही सर्व कामे करण्यामध्ये गावचा असलेला लोकसहभाग, तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून उभे राहिलेले काम या संदर्भातील माहिती कासारे गावचे उपक्रमशील सरपंच शिवाजीराव निमसे व सामाजिक कार्यकर्ते वसंतराव दातीर व ग्रामस्थांनी लिथुआनियाच्या भारतीय राजदूत मिसेस डायना व डॉ. सारा अहमद यांना दिली.

यावेळी नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कासारे गावात झालेल्या पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांची पाहणी मेसेज डायना व डॉ. सारा अहमद यांनी थेट गावातील महादेव डोंगरावर जाऊन केली.
यावेळी मिसेस डायना व डॉ. सारा अहमद यांच्या समवेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी घाडगे, पुणे येथील फादर स्टॅन्ड फर्नांडिस, फादर सिजू, सोशल सेंटर सेक्रेटरी थॉमस पडघमल, सुनील चक्रे, कासारे गावचे सरपंच शिवाजीराव निमसे, उपसरपंच शैलाताई घनवट, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव दातीर, ग्रामसेविका प्रभाविती डेरे मॅडम, धोंडीभाऊ खरात, शंकर कासोटे, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा दाते, तुळशीराम लगड, शंकरराव घनवट, पोपटराव नरड, संतोष घनवट, भाऊसाहेब नरड, सखाराम नरड, गोकुळ निमसे, प्रताप दातीर, देवराम घनवट, पप्पू कासोटे, भाऊ खरात, शंकर मिसाळ, तुकाराम साळवे, उत्तम साळवे, गौतम साळवे, संतोष घनवट, उषा निमसे, ज्योती घनवट, कल्पना निमसे, मीरा निमसे, जोशना चौरे, जया नरड, पवार सर झिंझाड मॅडम आदी कासारे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
:
पाणी व्यवस्थापन हे गरजेचे आहे. सोशल सेंटरच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकासाची अनेक कामे गावात मार्गी लागली आहेत. भौगोलिक दृष्ट्या कासारे गाव नक्कीच विविधता पूर्ण आहे. लोकसहभागातून सुरू असलेला हा बदल नक्कीच चांगला आहे. सरपंच निमसे गावात घडवत असलेला बदल नक्कीच स्वागतहार्य आहे. कासारे गावाला भेट दिल्या नंतर आनंद वाटला.
मिसेस डायना (राजदूत, लिथुआनिया)
:
राहुरी कृषी विद्यापीठ कासारे गाव दत्तक घेणार
कासारे गाव राहुरी कृषी विद्यापीठ दत्तक घेणार आहे असे विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी घाडगे यांनी यावेळी जाहीर केले. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून गावात पाणी व्यवस्थापनावर मोठे काम करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील अनेक योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत. पिकासाठी योग्य पाण्याचे नियोजन कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचनचा योग्य वापर करून शेती कशा पद्धतीने फुलवता येईल यावर विशेष करून कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ या ठिकाणी येऊन काम करणार आहेत. असे यावेळी डॉ. घाडगे यांनी सांगितले.