राजेश्वरी कोठावळे-दिवटे यांना राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेरच्या राजेश्वरी कोठावळे-दिवटे यांना नुकतेच दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक कामाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख राजेश्वरी कोठावळे-दिवटे यांनी निर्माण केली आहे. महिलांच्या हिताचे विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी कोठावळे या काम करत असतात. उपक्रमशील युवती म्हणून त्यांच्याकडे आज समाजामध्ये पाहिले जाते. कोरोना काळात त्यांनी केलेले काम हे राज्यात गौरविले गेले. क्रीडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. कराटेच्या माध्यमातून अनेक खेळाडू त्यांनी घडवले. सांस्कृतिक सामाजिक कामाची ही आवड त्यांना आहे. त्या नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. पर्यावरण पूरक उपक्रम त्यांनी आजपर्यंत राबवले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी पक्षाने त्यांना अहमदनगर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. पक्ष संघटनेतही त्यांचे काम उत्तम सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष संघटनेत काम करत असताना त्यांनी अनेक जनहिताची कामे मार्गी लावली आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान व राष्ट्रीय पर्यटन विकास तथा सांस्कृतिक कला महोत्सव संस्थान यांच्या माध्यमातून राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार 2023 हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार राजेश्वरी कोठावळे दिवटे यांना नवी दिल्ली या ठिकाणी प्रदान करण्यात आला.
यावेळी राजेश्वरी कोठावळे-दिवटे म्हणाल्या हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आपण समाज हिताचे योग्य पद्धतीने काम करत असल्याचे लक्षात येते याचा मला मनस्वी आनंद वाटतो व सामाजिक काम करताना प्रेरणा मिळते.यापुढील काळातही महिलांसाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात काम करण्याचा मानस आहे. महिला भगिनींचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी यापुढेही तत्पर राहणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार 2023 राजेश्वरी कोठावळे दिवटे यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते निलेश लंके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
