
संगमनेर प्रतिनिधी
वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणार्या ‘चपराक प्रकाशन’ने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. नाशिक येथील युवा कवी आणि गीतकार प्रशांत केेंदळे यांचे ‘विठु नाम’ हे भक्तीगीत वारीच्या निमित्ताने प्रदर्शित केले असून सध्याचा आघाडीचा गायक गौरव चाटी यांनी ते आर्त आणि सुमधुर स्वरात सादर केले आहे. कोल्हापूरच्या प्रवीण ऐवळे यांनी ते संगीतबद्ध केले आहे. पदार्पणातीलच या गीताला रसिक श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे प्रकाशक आणि निर्माते घनश्याम पाटील यांनी सांगितले.
चपराक प्रकाशनने राज्यभरातील नव्या-जुन्या लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. 2002 सालापासून ‘साहित्य चपराक’ हे वाङमयीन मासिक प्रकाशित होते. या मासिकातील निवडक कथा, लेखांच्या अभिवाचनाचे व्हिडिओ चपराकच्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध करून दिल्याने हा ज्ञानसाठा दृकश्राव्य माध्यमात आला आहे. त्यासाठी भारतातीलच नाही तर अमेरिका, कॅनडा, ऑस्टे्रलिया, जर्मनी अशा अनेक देशांतील मराठी अभिवाचकांनी पुढाकार घेतला आहे.
विठु नाम या गाण्यानंतर केदार मांजरे आणि ज्योती घनश्याम यांचे ‘जीव नादावला’ हे प्रेमगीत श्रोत्यांच्या भेटीस येत आहे. शुभम भोसले यांनी हे स्वरबद्ध केले आहे. सध्या चपराकच्या युट्युब चॅनेलवर अनेक मान्यवरांचे कथा, कविता, लेख आणि अन्य विषयांवरील साहित्य नियमितपणे देण्यात येत आहे. यापुढे गाण्यांचे अल्बम, शॉर्ट फिल्मस, वेब सिरीज, डॉक्युमेंटरी अशा माध्यमातून मराठी लेखकांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे घनश्याम पाटील यांनी सांगितले.
- विविध पुस्तकांचे अभिवाचन करून त्याचे क्युआर कोड पुस्तकात प्रकाशित केल्याने चपराकची अनेक पुस्तके वाचण्याबरोबरच ऐकता आणि पाहताही येतात. कोकणातील ज्येष्ठ लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा’ या व्यक्तिचित्रणाचे पुस्तक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या निवृत्त अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे-गावडे यांचा ‘वाटले मला जे’ हा संग्रह, संगमनेर येथील हिरालाल पगडाल यांचे ‘चिन्नण्णा’ हे आत्मचरित्र आदी पुस्तकांना हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. तंत्रज्ञानाच्या सहायाने वाचकांना श्रवणाचा आनंद देणारी प्रकाशन संस्था म्हणून चपराकच्या या उमपक्रमाचे कौतुक होत आहे.