विजेच्या खेळखंडोबा बाबत संगमनेर तालुक्यातील शेतकरी संतप्त

चुकीच्या कामांवर जनतेचा दबाव ठेवा – माजी मंत्री थोरात
संगमनेर (प्रतिनिधी)–लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मागील 40 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी सातत्याने काम केले. जनतेला कोणत्याही प्रश्नाबाबत मागणी करावी लागली नाही. अगोदरच अडचणी सोडवल्या गेल्या. मात्र आता मागील तीन महिन्यातच तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा झाला असून त्यामुळे पाणी उचलता येत नाही आणि हे पाणी पूर्वेला नेले जात असल्याची संतप्त व्यथा तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे मांडल्या.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वीज व पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. यावेळी मा आ डॉ सुधीर तांबे, ॲड माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, पांडुरंग घुले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना मांडताना म्हटले आहे की मागील तीन महिन्यापासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा पूर्ण खेळ खंडोबा झाला आहे पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे. मात्र असे न होता अगदी चार तास लाईट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीचे पाणी उचलता येत नाही.
संगमनेर तालुक्यातील विज बंद ठेवून हे पाणी पूर्वेला देण्यासाठी सत्ताधारी काम करत आहे आणि येथील नवीन लोकप्रतिनिधी त्यांच्या तालावर नाचत आहे. काही गावांमध्ये सत्कार घेताना नवीन लोकप्रतिनिधीने जोरात जाहिरात बाजी केली मात्र पाणी प्रश्न आणि मूळ समस्यांबाबत ते काही बोलायला तयार नाही. मूळ म्हणजे त्यांचे काही चालत नाही. पूर्वेकडील नेत्यांच्या इशारा वरती ते काम करत आहे हे दुर्दैव आहे अशी भावना. बुवाजी बाबा पुणेकर, आर बी राहणे, अरुण गुंजाळ, भास्कर बागुल, ज्ञानेश्वर सानप, ज्ञानेश्वर कडनर, सचिन काकड, गणेश भागवत, विलास वरपे, यांसह जाखुरी ,पिंपरने जोर्वे, नान्नज दुमाला, जांबुत, खाडगाव, नीमज या गावातील शेतकऱ्यांनी मांडल्या.

तर यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय करून संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा त्यांचा डाव आहे. याबाबत नवीन लोकप्रतिनिधीला काही माहीत नाही. तहसीलदार असा निर्णय घेतोच कसा त्याच्यावर कोणाचा दबाव आहे ते त्यांनी सांगितले पाहिजे. जनतेचा दबा वाढला म्हणून आता महसूल मंडळाची फेर रचना करणार असे सांगत आहे परंतु मी सहा वर्ष महसूल मंत्री राहिलो आहे. चुकीची माहिती देत आहेत. तालुक्यावर अनेक संकटे येणार आहेत तालुक्याची अर्थव्यवस्था मोडण्याचा त्यांचा डाव आहे. चुकीच्या कामानबाबत सर्वांनी जागृत राहिले पाहिजे. जनतेचा दबाव त्यांच्यावर राहिला पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक गावाला पाणी देण्याची आपले नियोजन होते त्यासाठी आपण काम केले. अडचणी येण्यापूर्वीच त्या सोडवल्या जायच्या त्यामुळे मागील 40 वर्षात जनतेला या गोष्टी कळाल्या नाही. आता संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन दबाव ठेवला पाहिजे असे ते म्हणाले.
यानंतर सर्व शेतकऱ्यांनी तीन तारखेला वीज अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असून जर आठ दिवसांमध्येपूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला.