सैनिक बँकेचे ते ६,७९९ सभासद अखेर पात्र ठरले जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय.

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या १०० रूपये शेअर्स भाग असणारे ६ हजार ७९९ सभासद मतदानास पात्र ठरले असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिला असून २६ जून २०२३ रोजी १२ हजार मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
४१४८ पात्र तर ६७९९ अपात्र अशी सैनिक बँकेची नुकतीच प्रारूप यादी प्रसिद्ध झाली होती.त्यावर सभासद बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, मारुती पोटघन, विक्रमसिंह कळमकर यांनी हरकत घेतली होती.जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सर्वाना मतदानाचा अधिकार मिळावा या मेरीटवर व बँकेने सभासदांना अपात्र केल्याबाबत सभासदांना वैयक्तीकरित्या कळविले नाही व सभासदांना वाजवी संधी दिली नाही या नियमाचा आधार घेत सर्वांना पात्र केल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे १२ हजार सभासदांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
सभासद अपात्र करण्याचा व्यवहारे,कोरडेंचा आटापिटा निष्फळ- बाळासाहेब नरसाळे
सैनिक बँकेच्या संस्थापक सभासदांना मतदानाचा आधिकार मिळू नये म्हणून शिवाजी व्यवहारे,संजय तरटे, नामदेव काळे,शिवाजी सुकाळे व व्यवस्थापक संजय कोरडे यांनी उपविधीला स्थगिती मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत स्थगिती मिळवली होती. सभासद अपात्र व्हावेत म्हणून खूप आटापिटा केला मात्र जिल्हा उपनिबंधक गणेश पूरी यांनी सभासद हिताचा निर्णय दिला असून आम्ही सर्व संस्थापक सभासद या निर्णयाचे स्वागत करतो. अशा भावना सभासद बाळासाहेब नरसाळे,कॅप्टन विठ्ठल वराळ, विनायक गोस्वामी, मारुती पोटघन, विक्रमसिंह कळमकर, विद्यमान संचालक बबनराव दिघे,सुदाम कोथिंबीरे, बबनराव सालके यांनी व्यक्त केल्या.
सत्ताधारी मंडळाचा जनतेच्या न्यायालयात पराभव होईल-विक्रमसिंह कळमकर.
पैशाच्या जोरावर सभासदांच्या मतदानाचा हक्क डावलू पाहणाऱ्या सत्ताधारी संचालक मंडळाला जिल्हा उपनिबंधकांनी मोठी चपराक लगावली आहे. जवळ जवळ ६ हजार ७९९ सभासदांना अपात्र करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ धडपड करत होते आता हेच संस्थापक सभासद जनतेच्या न्यायालयात विद्यमान संचालकांना पराभूत करतील.