सुपा परिसरातील भाडेकरूंची नोंद ठेवण्याबाबत पोलिसांना निवेदन

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सुपा तसेच म्हसने फाटा परिसरात नव्याने विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करण्यासाठी परप्रांतीय कामगार आलेले आहेत परंतु त्या कामगारांची कुठलीही नोंद ग्रामपंचायत तसेच पोलीस स्टेशनमध्ये नाही. या भाडेकरूंच्या नोंदी बाबत रजिस्टर तयार करून त्याची नोंद घेण्यात यावी याबाबत सर्व ग्रामपंचायत यांना सुचित करावे असे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश कुलथे यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिले. या निवेदनात म्हटले आहे की सोपा एमआयडीसी परिसरातील मसणे फाटा, पळवे खुर्द,पळवे बुद्रुक, बाबुर्डी, म्हसने, वाघुंडे खुर्द, वाघुंडे बुद्रुक, हंगा, मठ वस्ती, पाचारणे वस्ती, बारगळ वस्ती, शेलार मळा अपधुप, आसपासच्या इतर गावांमध्ये एमआयडीसी मुळे बाहेरील राज्यातून येणाऱ्या कामगारांचा वावर वाढला असून ते भाडे तत्वावर आजूबाजूच्या गावांमध्ये राहतात. गावातील ग्रामपंचायत कडे किंवा घरमालकाकडे त्यांचे कुठलेही मूळ पत्ता नसताना त्यांना भाडेतत्त्वावर रूम दिलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात काही गुन्हेगार येथे आसरा घेऊन त्यांच्याकडे गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या परिसरात असे प्रकार घडत आहेत त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून बाहेरून आलेल्या या भाडेकरूंची घरमालक तसेच ग्रामपंचायतींना नोंद ठेवण्याबाबत सूचित करावे त्यामुळे बाहेरील राज्यातून येणाऱ्या गुन्हेगारांना चाप बसेल तसेच एखादा गुन्हा घडल्यास त्याची तपास कामी मोठी मदत होईल.