प्रति पंढरपूर पळशी या ठिकाणी गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम

पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील भाविक भक्तांचे श्रद्धेचे स्थान असलेले प्रति पंढरपूर पळशी या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भव्य उत्सव सोहळा होत असतो. जिल्ह्यातून राज्यातून तसेच तालुक्यातून विविध भागातून अनेक विठ्ठल भक्त या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी पळशी या तीर्थक्षेत्री येत असतात. पळशी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. गुरुवारी दि २९ जून रोजी पहाटे दोन वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर विविध अध्यात्मिक धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पारनेर तालुक्याचे नेते सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरामध्ये स्नान,अभिषेक, आरती असा महापूजेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे.
तसेच दिवसभर तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मंगलमय वातावरणामध्ये हा उत्सव सोहळा आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे संपन्न होत आहे. सकाळी आरती व पूजा संपन्न झाल्यानंतर सकाळी सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने चहा व खिचडीचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रति पंढरपूर पळशी या ठिकाणी परिसरातून व जिल्ह्यातून अनेक दिंड्या येत असतात.भाविक या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये भक्ती भावाने या ठिकाणी नेहमी दर्शनासाठी येतात. विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे.
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिठू जयवंत जाधव यांनी व सर्व विश्वस्त देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ पळशी यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
पार्किंगची देवस्थानच्या वतीने विशेष व्यवस्था
आषाढी एकादशीनिमित्त पळशी येथे मोठा उत्सव असतो. गेल्या वर्षी पार्किंगची व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यामुळे काही भाविकांना त्रास झाला होता याची विशेष दखल घेऊन देवस्थान समितीने गणपती महादेव मंदिराच्या पाठीमागे भव्य अशी पार्किंगची व्यवस्था केली आहे असे सांगण्यात आले.