इतर

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राहाता तालुक्यातील पीक नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

शिर्डी, दि.९ – राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाव वाडी, अस्तगावच्या काही भागांमध्ये चक्रीवादळ सदृश्य पावसाने डाळिंब, आंबा, ऊस व साठवलेला कांदा तसेच घरे, गोठा यांवर झाडे पडून मोठे प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, शासन नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

राहाता तालुक्यातील या नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत दिलासा दिला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, यांच्यासह वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यात मागील काही दिवसांत मोठ्या स्वरुपातील पावसाने झालेल्या नूकसानीचा विचार करता स्थायी आदेशाच्यापलीकडे जावून मदत करण्याचा विचार करावा लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. झालेल्या नूकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, महावितरणाचा विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

शनिवार, दि.७ जून रोजी सायंकाळी बाभळेश्वर, राजुरी, ममदापूर, तिसगाव, अस्तगाव या भागामध्ये चक्री वादळाने फळबागा तसेच शेती पीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. भाऊसाहेब विनायक म्हस्के यांची कांदा चाळ, डाळिंब उत्पादक राहुल सुरेश कसाब आणि डाळींबरत्न बी. टी. गोरे यांच्या डाळींब बागा थेट शेतात जाऊन या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्र्यांनी पाहणी केली.

वादळी वाऱ्यामुळे या भागातील वीज पुरवठा हा गेल्या दोन दिवसापासून बंद आहे. वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी युध्द पातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले. नैसर्गिक आपती असली तरी,भविष्यात नुकसान कसे टाळता येऊ शकते यावरच उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येकाचा पंचनामा करून तातडीने अहवाल सादर करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी डाळिंब उत्पादकांशीही संवाद साधला अनेक भागांमध्ये डाळिंब उत्पादकांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. राहुल कसाब यांची फळभाग पूर्णपणे भुईसपाट झाली आहे, या बागेची पुन्हा बांधणी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याविषयी डाळिंबरत्न डाॅ. बी.टी. गोरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आंबा, कांदा उत्पादकांना देखील या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. कांदा चाळीवर पडलेल्या झाडांमुळे भिजलेल्या कांद्याचे पंचनामे करून अहवाल त्वरित पाठवण्याची सूचनाही श्री.विखे पाटील केल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button