राधाकृष्ण विखे पाटलांना मुख्यमंत्रीपद मिळावे राहुल शिंदेंचे विठ्ठलाला साकडे!

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
आषाढी एकादशी निमित्त काल ( गुरुवारी ) अनेक भाविकांनी विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले. यात मुख्यमंत्र्यांपासून वारकऱ्यांपर्यंत अनेकजण होते. मात्र यंदाच्या आषाढी एकादशीमध्ये विठ्ठलाला राजकीय साकडे घातले गेले. भाजपचे पारनेरचे युवा नेते राहुल शिंदे यांनी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना २०२४ ला मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी विठ्ठलाला साकडे घातले.
दरम्यान राधाकृष्ण विखे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बाबतची चर्चा सध्या माध्यमांमधून चांगलीच रंगवली जात आहे. विखे कुटुंबाचे दिल्ली दरबारी वाढलेले वजन याला कारणीभूत आहे. राज्यात भाजप- शिवसेना शिंदे गटाचे सरकार येण्यासाठी राधाकृष्ण विखे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
राहुल शिंदे यांनी पळशीच्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर सांगितले की, राज्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील विकासकामांत विखे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. राज्यात असलेल्या सरकारमध्ये चांगल्या दर्जाचे महसूल व पशुसंवर्धन खाते विखे साहेबांना मिळाले आहे त्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेची सेवा करत आहेत. त्यांना पुढील वर्षी २०२४ मध्ये लवकरच मुख्यमंत्रीपद मिळेल. अशी अपेक्षा आम्हा कार्यकर्त्यांना आहे.
दरम्यान प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या पळशी तीर्थक्षेत्री आषाढी एकादशीनिमित्त विठुरायांच्या दर्शनासाठी जिल्हा परिषद जलसंधारण समितीचे सदस्य राहुल पाटील शिंदे, राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले, कडूस गावचे सरपंच मनोज मुंगसे, राळेगण थेरपाळ सेवा सोसायटीचे चेअरमन पांडुरंग कारखिले, टाकळी ढोकेश्वर मा. सरपंच शिवाजी खिलारी, वडझिरे मा. सरपंच बाळासाहेब दिघे, हे आले होते यावेळी त्यांचा व सहकाऱ्यांचा देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष मिठूशेठ जाधव, ज्येष्ठ नेते सुभाष गांधी, मा. उपसरपंच आप्पासाहेब शिंदे आदी पळशी येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात हा विखे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत आहेत. पारनेर तालुक्यातील प्रती पंढरपूर म्हणून पळशी येथील विठ्ठलाचे मंदिर ओळखले जाते. या मंदिरात भाजपचे नेते राहुल शिंदे यांनी काल (गुरुवारी) दर्शन घेऊन राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असे साकडेच विठ्ठलाला घातले.