वनकुटे येथे वाळू तस्करांवर कारवाई ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील वनकुटे येथे मुळा नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
मुळा नदीपात्रात गोरख वाबळे (रा. वनकुटे) हा ट्रॅक्टरमधून विनापरवाना वाळूउपसा करून वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ रणजित जाधव, संतोष खैरे, शाम गुजर, सूरज कदम यांचे पथक पाठविले. पथकाला मुळा नदी पात्रालगत एक ट्रॅक्टर आढळला. ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले. त्याने आपले नाव गोरख जयसिंग वाबळे (वय ३५, रा. हनुमाननगर, वनकुटे, ता. पारनेर) असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वाळू उत्खनन व वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले.
यावेळी ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रॉलीतील वाळू असा ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तो पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ट्रॅक्टर मालक नसीर शेख (रा. वनकुटे, ता. पारनेर) व गोरख वाबळे यांच्याविरूद्ध पोलिस कॉन्स्टेबल रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.