सागर लगडची पीएसआय पदी निवड; भूमिपुत्राचा कासारेकरांनी केला सन्मान

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील कासारे येथील युवक सागर तुळशीराम लगड याने नुकत्याच निकाल लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तम यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली.
कासारे सारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेला असताना उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी तो गेल्या चार वर्षापासून करत होता. अखेर सागर लगड याला यश मिळाले व कासारे गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला.
आई वडील शेतकरी सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला. जिद्द आणि चिकाटी व मेहनतीच्या जोरावर सागर लगडने हे दैदिप्यमान यश मिळविले आहे.
तो विद्यार्थी दशेपासूनच हुशार आणि चाणाक्ष बुद्धिमत्तेचा होता.
पारनेर तालुक्यातील सागर लगड हा कासारे गावचा भूमिपुत्र असल्यामुळे गावातील ग्रामस्थांकडून तसेच परिसरातून त्याने मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सागर लगडचा सन्मान करून त्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी कासारे ग्रामपंचायत सरपंच शिवाजीराव निमसे व बिरोबा देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या वतीने सागरचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी उपक्रमशील सरपंच निमसे म्हणाले सागर लगड हा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी परंतु अभ्यास आणि मेहनत योग्य नियोजन याच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवत पीएसआय म्हणून निवड झाली ही आमच्या कासारे गावासाठी अभिमानास्पद आहे. यापुढे गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे व ग्रामीण भागामध्ये असे विद्यार्थी घडले पाहिजेत असे ते म्हणाले व सागरला यावेळी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या दरम्यान सत्कार प्रसंगी कासारे गावचे उपक्रमशील सरपंच शिवाजी निमसे, यांच्या समवेत सोशल सेंटरचे फादर सिजू, समन्वयक थॉमस पलघडमल, कृषी विभागाचे मंडल अधिकारी आशिष दिवटे, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव दातीर, प्रगती ग्रामीण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नाना वाळुंज,उपसरपंच शैलाताई घनवट, चेअरमन तुळशीराम लगड, रोहिदास दातीर, संतोष घनवट, तुकाराम साळवे, बाळासाहेब दातीर, गोकुळ निमसे, धोंडीभाऊ पानमंद, आदींसह कासारे येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.