पारनेर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ शिंगोटे यांचे निधन

वयाच्या 103 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ,
शासकीय इतमामात घाणेगाव येथे अंत्यसंस्कार
दत्ता ठुबे
पारनेर:-पारनेर तालुक्यातील शेवटचे स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ रावजी शिंगोटे यांनी गुरुवारी सकाळी 10:00 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते 103 वर्षाचे होते. सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये ते सैनिक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. भारताची ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्या काळात देश प्रेमाने प्रेरित होऊन काशिनाथ शिंगोटे यांनी आझाद हिंद सेनेमध्ये सैनिक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षाहून अधिक काळ ते आझाद हिंद सेनेमध्ये कार्यरत होते. सुभाष बाबू यांच्यासोबत काम करत असताना आम्हाला आमच्या कुटुंबाची घराची आठवण आली नाही असे सांगणारे काशिनाथ शिंगोटे हे पारनेर तालुक्यातील घाणेगाव येथील रहिवासी होते. शंभरी ओलांडल्या नंतरही त्यांच्या नसानसामध्ये देश प्रेम भरलेले दिसून येत होते. दुसरीपर्यंत शिक्षण झालेले काशिनाथ शिंगोटे सन 1939 ते ब्रिटिश फौजेत दाखल झाले होते. त्यांना ब्रिटिशांनी सण 1994 च्या सुमारास जपानच्या मोहिमेवर पाठवले. दुर्दैवाने ते जपान सरकारच्या तावडीत सापडले. जपान सरकारने त्यांना सहा महिने तुरुंगात डांबले. त्या काळात सुभाष बाबूंनी पाणबुडीत प्रवास करून जपान गाठले, जपान सरकारशी बोलणी करून काशिनाथराव व त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका केली होती. जपान वरून परतल्यानंतर सुभाष बाबूंनी 75 हजार तरुणांना सोबत घेऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. काशिनाथराव व त्यांचे सहकारी त्या सेनेत सहभागी झाले होते. त्यांच्या अंत्ययात्रेत घाणेगाव पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्रपट देऊन केंद्र सरकारच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला होता तसेच 1 मे 1986 रोजी महाराष्ट्र सरकारच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते तसेच पारनेर नगरचे आ. निलेश लंके यांनी घाणेगाव येथे जाऊन काशिनाथ शिंगोटे यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला होता. त्यांच्या पश्चात 3 मुले 2 मुली व 8 नातवंडे असून एक नातू लष्करात देश सेवा करत आहे. स्वर्गीय काशिनाथ शिंगोटे यांच्यावर दुपारी 3:00 वाजेच्या सुमारास घाणेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्ञानदेव लंके गुरुजी, पारनेरच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे, तसेच नगर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यासाठी पोलीस पथक घाणेगाव येथे आले होते. त्यांचा मृतदेह राष्ट्रध्वजामध्ये लपेटून मानवंदना देण्यात आली. त्या ठिकाणी आजी-माजी सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. सैनिक संघटनेचे सोपान पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली तसेच रावसाहेब दरेकर गुरुजी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व श्रद्धांजली अर्पण केली.