जी -ट्वेंटी परिषदेला बीजमाता राहीबाई यांनी केले संबोधित.

अकोले/प्रतिनिधी-
गुजरात मधील आनंद येथे नुकतीच जी – 20 परिषद पार पडली . जगभरातील सुमारे 17 देशातील सदस्यांनी या परिषदेसाठी सहभाग नोंदवला होता.
या परिषदेमध्ये अकोले तालुक्यातील बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे या खास निमंत्रित होत्या. वुमन्स ट्वेंटी म्हणून आयोजित या परिषदेमध्ये राहीबाई यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

राष्ट्रीय डेरी विकास बोर्ड आनंद (एन .डी. डी.बी ) तसेच पशु व दुग्धविकास मंत्रालय भारत सरकार , फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन युनायटेड स्टेट, गुजरात सहकारी दूध वितरण संघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन गुजरात राज्यातील आनंद येथे करण्यात आले होते.
परिषदेसाठी विविध देशातून तसेच भारतातील अनेक प्रांतातून महिला उद्योजक व दुग्ध विकास सहकारी संस्थांचे महिला प्रतिनिधी उपस्थित होते. जनभागीदारी या सदराखाली घेण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्रात राहीबाई बोलत होत्या. राहीबाई यांच्यासोबत व्यासपीठावर मिसाईल वुमेन म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकल्प संचालक अग्नि क्षेपणास्त्र -चार च्या टेसी थॉमस , आंतरराष्ट्रीय खेळाडू व ऑलिंपिक पदक विजेती खेळाडू लज्जा गोस्वामी,डॉक्टर संध्या पुरेच्या वुमन्स ट्वेंटी परिषद- आनंद अध्यक्ष , धरित्री पटनायक मुख्य समन्वयक वुमन्स ट्वेंटी परिषद -आनंद याही उपस्थित होत्या.

सभागृहातील उपस्थितांना मार्गदर्शन करताना पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी विषमुक्त भारत -सशक्त भारत या विषयाचा नारा दिला. विषमुक्त शेती करायची असेल तर गावरान बियाण्यांचे संवर्धन प्रत्येक गावाने व शेतकऱ्यांनी केले पाहिजे .प्रत्येक गावात गावरान बियांची शेतकऱ्यांच्या सहभागाने बँक तयार व्हावी .यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर गावरान बियाणे पोहोचवण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करील असे प्रतिपादन त्यांनी केले.घरच्या गरीब परिस्थितीमुळे मी शाळा शिकू शकले नाही परंतु निसर्गाच्या शाळेत मी भरपूर शिकली आहे .म्हणून मला मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. सभागृहातील उपस्थितांना प्रभावित करणारे मार्गदर्शन राहीबाई यांनी केल्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा सुरू होती. देश विदेशातील लोकांनी त्यांच्याभोवती मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. देशी बियाणे जवळपास संपुष्टात आल्याने त्यांची मागणी विविध राज्यातील महिलांनी राहीबाई यांच्याकडे केली. आपणा सर्वांपर्यंत गावरान बियाणे पोहोचवण्यासाठी बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने मी प्रयत्न करील असे आश्वासन त्यांनी गावरान बियाणे मागणी करणाऱ्या महिलांना दिले.
या दौऱ्याचे नियोजन बायफ संस्थेचे अतिरिक्त राज्य समन्वयक जितिन साठे यांनी केले होते. अमृतसागर दूध संघाचे कार्यकारी व्यवस्थापक दादाभाऊ सावंत यांनी परिषदेसाठी आलेल्या विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस , सेंद्रिय खत निर्मिती, शेतीसाठी लागणारे जैविक औषधे निर्मिती यासारख्या उपक्रमांना दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन घेतले. या दौऱ्यासाठी राष्ट्रीय डेरी विकास बोर्ड मुंबई येथील स्वाती श्रीवास्तव यांनी विशेष मार्गदर्शन व नियोजन केले होते. याप्रसंगी विविध राज्यातून आलेल्या दूध उत्पादक महिलांचा सन्मान त्यांच्या कार्याची ओळख करून देत करण्यात आला.
