इतर

प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी!

पुणे- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते बालेवाडी, पुणे येथे झालेल्या ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्राला पहिल्याच वर्षी विक्रमी 20 लाख घरे दिल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 13.57 लाख घरे मिळाली होती. त्यापैकी 12.65 लाख घरे बांधून पूर्ण झाली असून उर्वरित घरांचे काम सुरु आहे.

केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दोन महिन्यापूर्वी पुणे येथेच 20 लाख घरांच्या मंजुरीचे पत्र वितरण व 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे वितरण यासाठी दिलेले 100 दिवसांचे लक्ष्य केवळ 45 दिवसांत पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अभिनंदन केले. तसेच उर्वरित 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यातदेखील पुढच्या 15 दिवसांत पहिल्या हप्त्याची रक्कम निश्चितपणे हस्तांतरित केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आतापर्यंत ₹1 लाख 60 हजारांचे अनुदान देण्यात येत होते, त्यामध्ये आता ₹50 हजारांची वाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांना ₹2 लाखांपेक्षा अधिक अनुदान मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने गरीब, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांच्या कल्याणाला प्राधान्य देत असून यामुळे योजनेतील 20 लाख लाभार्थ्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळण्यासाठी सोलर अनुदान देणार आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-1 अंतर्गत 13.57 लाख आणि टप्पा-2 अंतर्गत 20 लाख घरे यांसह रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, अहिल्या आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, ओबीसींसाठीच्या मोदी आवास या सर्व योजनांतर्गतची 17 लाख अशी एकूण 51 लाख घरे देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु आहे, यासाठी सुमारे ₹70 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येत असून यामध्ये सोलर अनुदान जोडले तर तब्बल ₹1 लाख कोटींचा निधी केवळ सामान्य माणसाला घरे देण्याकरता वापरणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे सभापती प्रोफेसर राम शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button