भाजपचे आमदार राम शिंदेंना धमकी देणाऱ्याला उज्जैनमधून अटक

अहमदनगर:- आमदार राम शिंदे यांना फेसबुक लाईव्ह करून जिवे ठार मारण्याची धमकी देणार्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उज्जैन (मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले आहे.
सागर सुभाष गवासणे (34 रा. पिंपळगाव उंडा, ता. जामखेड, हल्ली रा. वाकड, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द 10 गुन्हे दाखल आहेत. 30 मे 2023 रोजी अमित अरूण चिंतामणी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यतिथी कार्यक्रमाचे तयारी करीत असताना त्याच्या मोबाईलवर सागर गवासणे याने फोन करून, तुम्ही राम शिंदे साहेबांच्या जवळचे आहात, त्यांना जुळवून घेण्याचे सांगा, नाहीतर पाहुन घेईन, अशी फेसबुक लाईव्ह करून आ. शिंदे व अपरिचीत व्यक्तीचे नाव घेऊन घरात घुसून मारीन, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने एलसीबी या गुन्ह्याचा तपास करत होती. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, राम माळी, रविंद्र कर्डिले, सचिन अडबल, प्रशांत राठोड, राहुल गुड्डू, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने गवासणे याचा मध्यप्रदेशातील उज्जैन व इंदौर परिसरात फिरून माहिती घेत असताना तो उज्जैन परिसरात मिळून आल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.