हरी नरके सरांची एक्झिट अत्यंत धक्कादायक

हरी नरके सर ज्या झोपडपट्टीत राहात होते तिथे शिक्षणाची परंपरा नव्हती. त्यांच्या घरातले शिक्षण घेणारे ते पहिलेच होते. शांताबाई कांबळे ही त्यांच्या आईची एक मानलेली बहीण. ते तिला शांतामावशी म्हणत.
ती सतत हरीच्या आईला सांगायची की पोराला शाळेत घाल.
त्याकडे त्यांची आई दुर्लक्ष करत असे. मात्र एके दिवशी आई वैतागली.
एकदा तिने मोठ्या मुलाला म्हणजे नरकेंच्या भावाला सांगितलं की,
“त्या शांताबाईचा एक नातेवाईक आहे कुणीतरी बाबासाहेब आंबेडकर, तो सारखं सांगतो पोरांना शाळेत घाला. त्यामुळे त्या शांताबाईने डोकं खाल्लं आहे, उद्या हरीला घेऊन शाळेत जा”.
मोठा भाऊ आणि किशोरवयीन हरी नरके शाळेत गेले.
मुख्याध्यापकांना भेटले. मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष संपलं असल्याची माहिती दिली, आता तुम्ही शाळेत कसं आणता असा सवालही केला.
त्यावर नरकेंचा मोठा भाऊ उत्तरला – “आम्ही म्हणूनच याला शाळेत घालत नव्हतो. काल पाडवा झाला वर्ष सुरु झालं आणि तुम्ही म्हणताय वर्ष संपलं? शिकला तो हुकला असंच आहे हे!”
भावाच्या या वाक्यानंतर मुख्याध्यापकांनी अर्ध्यातच थांबवलं, स्वतःच कागद घेतला नि अर्जही लिहिला. नरकेंच्या मोठ्या भावाला सांगितलं की १ जूनला याला शाळेत घेऊन ये. त्यानंतर हरी नरके शाळेत गेले!
बाबासाहेब आंबेडकरांनी ही प्रेरणा निर्माण केली नसती तर आपण शिकू शकलो नसतो हे हरी नरकेंच्या लक्षात आले.
त्यांच्या आईला शांता मावशींनी प्रेरित केलं त्यामुळे ते शाळेत जाऊ शकले.
त्यांचे शिक्षक कांबळे सरांच्या घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. तो त्यांना खूप आवडलेला. त्यांनी सरांकडो तो फोटो मागितला आणि त्यांच्या घरात लावला. परिणामी त्यांच्या घरात जणू प्रचंड भूकंप झाला.
कारण बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांच्या घरात लावला म्हणून त्यांच्या मामाने त्यांना रक्त येईपर्यंत मारलं.
ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला आईने शाळेत घातलं त्यांचा फोटो आपल्या घरात चालत नाही हे त्यांना माहित नव्हतं.
कारण तो काळ नामांतर चळवळीचा होता.
आंबेडकरांचे लेखन वाचताना हरी नरकेंचे अन्य चौफेर वाचनही जारी होते. साप्ताहिक ‘सोबत’मध्ये बाळ गांगल यांनी अत्यंत गलिच्छ शब्दात महात्मा फुलेंची बदनामी करणारा प्रक्षोभक लेख लिहिला त्यातील हरेक मुद्याची तरुण हरी नरकेंनि चिरफाड केली.
पुलंनी त्याला पुस्तकरूप देण्याचे सुचवले.
तिथून नरके सरांना ‘सावित्री -जोति’च्या विचारांनी अक्षरशः झपाटले!
त्यांनी अत्यंत आक्रमकपणे शाहू फुले आंबेडकर विचार मांडले!
हरी नरके सरांची एक्झिट अत्यंत धक्कादायक आणि चटका लावणारी आहे. हक्काचा मार्गदर्शक गमावला. विद्रोही विचारांचा, ज्ञानी व्यासंगी, सहृदयी माणूस गेला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून नेटाने शिक्षण घेऊन स्वबळावर पुढे आलेल्या नरके सरांनी ओबीसींच्या वैचारिक बैठकीसाठी मेहनत घेतली होती, न्याय हक्कांसाठी आवाज उठवला होता.
चपखल युक्तिवाद करुन अनुचित अनुदार वक्तव्यांचा त्यांनी अनेकदा समाचार घेतलेला. अत्यंत निर्भीडपणे ते प्रतिवाद करत असत.
‘शाहू फुले आंबेडकर’ हा केवळ परवलीचा जयघोषकारक शब्द नसून तो ज्ञानाचा नि संघर्षाचा वसा आहे असे ते नेहमी म्हणत आणि त्यानुरूप स्वतःचे आचरण असावे याकडे त्यांचा कल असे.
टोकाच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी यावं लागलं तरी सबळ पुरावे नि भक्कम संदर्भ याच्या शिदोरीवर ते आपल्या मतांवर ते ठाम असत. अभ्यास, वाचन आणि आकलन याच्या बळावर त्यांचे नाव सर्वदूर झालेलं!
माझ्या लेखनावर ते पुष्कळदा व्यक्त होत असत. लेखनातले कच्चे दुवे, भल्या बुऱ्या गोष्टी निदर्शनास आणून देत. ते अत्यंत परखड दोषदर्शक होते, मात्र त्यामागची त्यांची भूमिका सार्वजनिक हितैषी असे.
त्यांच्या जाण्याने चालतं बोलतं विद्यापीठ गेलं.
कालपरवा पर्यंत त्यांच्या संपर्कात होतो नि आज ते नाहीत ही गोष्ट रुचत नाहीये.
भावपूर्ण श्रद्धांजली..
- समीर गायकवाड यांच्या वाॅलवरून.