साईसंस्थान पतपेढी करणार सभासदांची दिवाळी गोड

शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
साईसंस्थान नोकरांच्या पतपेढीतर्फे दिवाळीनिमित्त सभासदांना १५ टक्के डिव्हीडंट आणि ठेवीवर नऊ टक्के व्याज, असे मिळून दोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम कामगारांना दिवाळी भेट स्वरूपात दिली जाईल. त्याचबरोबर भिंतीवर घड्याळ, पाच लिटर तेलाचा डबा, प्रत्येकी एक किलो फरसाण व एक किलो मिठाई, तसेच ५० किलो साखर देऊन संस्थेच्या सुमारे अठराशे सभासदांची दिवाळी गोड केली जाईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिली.
ते म्हणाले, येत्या गुरुवारी (ता.१७) साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, महंत रामगिरी महाराज व महंत काशिकानंद महाराज यांच्या उपस्थितीत दिवाळी भेट वितरणास प्रारंभ केला जाईल. संस्थेचे सभासद शिर्डी परिसरातील १५ ते २० गावांत वास्तव्यास आहेत. सभासदांच्या घरातील महिलांनी केलेल्या मागणीनुसार दिवाळी भेट वस्तू त्यांच्या गावापर्यंत पोहोच करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. साईसंस्थानच्या सहकार्यामुळे संस्थेला भाविकांसाठी विविध सेवा पुरवविण्याची संधी मिळते. त्यामुळे संस्थेची वार्षिक उलाढाल दीडशे कोटी रुपयांपर्यंत वाढली. भाविकांना वाजवी दरात दर्जेदार वस्तू मिळाव्यात संचालक मंडळाने ठोस पावले उचलली.
पूर्वीच्या तुलनेत भाविकांसाठी दर्जेदार पेढा उपलब्ध करून देण्यात आला. संस्थेतर्फे साईतीर्थ नावाने लवकरच बाटलीबंद शुध्द पाणी विक्रीसाठी आणले जाईल. संस्थेच्या सर्व स्टॉलवर भाव फलक लावण्यात आले. तेथे लवकरच गुगल व फोन पेची सुविधा दिली जाईल. डिजिटल लॉकर सिस्टिम कार्यान्वित केली जाईल. डोळ्याद्वारे येथील लॉकर उघडले जातील आणि बंद ही केले जातील, त्यावर काम सुरू आहे.
नवे संचालक मंडळ सत्तारूढ होऊन जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी झाला. याकाळात बरच महत्त्वाचे आणि पारदर्शी निर्णय घेतले. भाविकांना दर्जेदार सेवा आणि संस्थेच्या नफ्यात ही मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळते. गेल्या सहा महिन्यांत संस्थेने सुमारे चार ‘कोटी रुपये नफा मिळविला. मागील काही वर्षांच्या तुलनेत तो जवळपास दुप्पट आहे.
-विठ्ठल पवार,अध्यक्ष, साईसंस्थान नोकरांची पतपेढी