आश्रम शाळा शिक्षकांसाठी रविवारी क्षमता चाचणी परीक्षा –प्रकल्प अधिकारी राजन पाटील

अकोले प्रतिनिधी
-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांसाठी रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी क्षमता चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. राजन पाटील यांनी दिली.
राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांचे विषय ज्ञान समृद्ध व्हावे, त्यांना स्वयं अध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संंधी मिळावी व आश्रम शाळा विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान मिळावे तसेच शिक्षकाची क्षमता दृढ व्हावी, विकसित व्हावी या उदात्त हेतूने शासनाने आदिवासी विकास विभागात कार्यरत असणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळा शिक्षकांची क्षमता चाचणी संपुर्ण राज्यात एकाच दिवशी आयोजित केली आहे. नुकत्याच आदिवासी विकास विभागाने राज्यातील आश्रम शाळा विद्यार्थ्यांसाठी क्षमता चाचणी परीक्षांचेही आयोजन केले होते सदर परीक्षांव्दारे विद्यार्थ्यांचे विषयज्ञान तपासण्यात आले आहे. तसेच राजूर प्रकल्प अंतर्गत ‘आश्रमशाळा परीक्षा मंडळ’ स्थापन करून इ.दहावीतील मुलांसाठी प्रत्येक शनिवारी दोन विषयांची ‘विकेंड टेस्ट ‘आयोजित करण्याचा उपक्रम 1 जुलै 2023 पासून हाती घेतलेला असून आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांची गुुणवत्ता सुधारण्याचा विशेष प्रयत्न केला जात आहे.
नगर जिल्ह्यातील एकवीस शासकीय व पंधरा अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी अकोले येथील अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2.00 ते 3.30 या कालावधीत सदर क्षमता चाचणी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.राजूर प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या 268 शासकीय व 165 अनुदानित असा एकूण 433 प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक , पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक या संवर्गासाठी सदर परीक्षा आयोजित केली आहे. सदर परीक्षेच्या नियोजनाची तयारी प्रकल्प स्तरावर करण्यात आली आहे.सदर परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन करणाऱ्या शिक्षकांना प्रकल्प कार्यालयामार्फत गौरवण्यात येणार आहे.तरी सर्व शिक्षकांनी आनंदी वातावरणात सदर परीक्षांना सामोरे जावे व परीक्षेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन राजूर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री राजन पाटील यांनी केले आहे.
——–/-