पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी क्रांती शुगर कंपनीचे नऊ संचालक व राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.!

दत्ता ठुबे/पारनेर :
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या क्रांती शुगर या खाजगी कंपनीचे नऊ संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
, पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून यातील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलीस ठाण्यात क्रांती शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले, पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले व निवृत्ती नवले या नऊ संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अनंत भुईभार व अनिल चव्हाण या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात आरोपींनी बनावट गहाणखताद्वारे पारनेर कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण करणे, बेकायदा साखर तारण कर्ज देणे, विक्री प्रक्रियेत एकाच निविदा धारकाला फायदा मिळवून देण्यासाठी बेकायदा मदत करणे, शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवणे, खरेदीखताला बनावट कागदपत्रे जोडणे, मालमत्तेवरील शासणाचा बोजा लपविणे, विक्री
व्यवहारात काळा पैसा पांढरा करणे, मालमत्ता विकुन उरलेली रक्कम कर्जदाराला परत न करणे, बॅकेकडे तारण नसलेल्या दहा हेक्टर जमीनीचा क्रांती शुगर कंपनीला बेकायदा ताबा देणे. या या विविध मुद्द्यांसह कारखाना बचाव समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ तसेच पारनेर येथील प्रथम न्यायालयाकडे धाव घेतली होती. झालेल्या गैरव्यवहाराचे सर्व पुरावे न्यायालयाकडे दाखल करण्यात आलेले होते, दाखल पुरावे व तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने नुकतेच केलेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर करत आहेत.

आरोपींच्या अटकेची मागणी…
पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कारखाना बचाव समितीकडून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबतचे निवेदन पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना देण्यात आलेले आहे.