अकोल्यात तृणधान्य पाककृती स्पर्धेत शाळांचा सहभाग !

अकोले प्रतिनिधी
: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत पंचायत समिती अकोले, आयोजित तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन मॉडर्न हायस्कूल येथे करण्यात आले.
पंतप्रधान यांनी 2023 हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याने, आपल्या आहारात तृणधान्याचे महत्त्व कळावे म्हणून तृणधान्यापासून वेगवेगळ्या पाककृती करण्याचे शालेय स्तरावर पालकांना सुचित करण्यात आले होते.
ही स्पर्धा प्रथम शाळास्तरावर पालक, विद्यार्थी शिक्षक, शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मध्ये घेण्यात आली त्यातील प्रथम क्रमांकाची निवड झालेल्या स्पर्धकांची तालुकास्तरावर निवड केली. यामध्ये 14 शाळांनी आपला सहभाग नोंदवला.
अनेक पौष्टिक घटक, कमी वेळात केलेल्या पाककृती, इंधन बचत, लहान मुले चवीने खातील, आणि झटपट होणाऱ्या पाककृती सादरीकरण यामध्ये दिसून आले.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रभारी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब दोरगे, स्पर्धाप्रमुख अधिक्षक अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी सविता कचरे, शिक्षण विस्तार अधिकारी मंदा आरोटे यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेचे परीक्षण गणेश जोशी, दिलशाद सय्यद मॅडम, ज्ञानेश्वर आदमाने, कल्पना मंडलिक यांनी दिलेल्या निकषानुसार पारदर्शकपणे मूल्यांकन केले. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सुंदर, स्वादिष्ट, रुचकर, पौष्टिक अशा बनवलेल्या पाककृतीचा आनंद सर्वांनी घेतला. या स्पर्धेसाठी मॉडर्न हायस्कूलच्या प्राचार्या सविता मुंदडा, उपप्राचार्य दिपक जोंधळे, कलाशिक्षक मीनानाथ खराटे यांचे सहकार्य लाभले.