खिरविरे च्या सर्वोदय विदया लयात पर्यावरणपूरक गणपतीचे दर्शन.!

अकोले /प्रतिनिधी-
नुकत्याच संपलेल्या गणेश उत्सवात अकोले तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना केली होती.
या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळालाच,त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाचाही संदेश देण्यात आला.
गणपतीच्या स्थापनेपूर्वी दोन दिवस अगोदर अकोले तालुक्यातील खिरविरे येथील “सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक”विदयालयातील प्राचार्य मधुकर मोखरे यांच्या कल्पनेतून आणि शाळेचे कलाशिक्षक भाऊसाहेब कोते यांच्या कृतीतून तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रयत्नातून मातीच्या गणेश मूर्ती साकारल्या.विद्यार्थ्यांनी परिसरातील वारुळांचा शोध घेऊन वारुळाची माती आणली.माती मळून शाळेच्या आवारात गणेशजींच्या छोट्या बालगोपाळांनी त्यात जीव ओतून गणेशजींच्या मूर्ती तयार केल्या .पाहता- पाहता एक दीड तासात एकूण 40 मूर्ती तयार झाल्या.

विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून विद्यार्थ्यांचे आई-वडील प्रत्यक्ष शाळेत येऊन आपल्या मुलात दडलेला कलाकार आणि त्याने मातीतून साकारलेल्या गणपती या मुर्ती पाहुन भाऊक होऊन दर्शन घेऊन गेले व शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले.विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मूर्तींचे पालकांनीच पसंती क्रमांक देऊन प्रथम व द्वितीय असे नंबर काढले.याच दोन मूर्तींची गणेश चतुर्थीला शाळेत स्थापना करण्यात आली.विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मूर्तीची शाळेत स्थापना करावी असाही आदर्श घालून दिला.सकाळ-संध्याकाळ शाळेत आरती उत्साहात होत असे.अशा पद्धतीने शाळेत इको फ्रेंडली पर्यावरण पूर्वक गणपतीचे दर्शन विद्यालयात गावकरी व विद्यार्थ्यांनी रोज घेतले.
प्राचार्य मधुकर मोखरे यांनी एका सहावीच्या पूजा बेनके या विद्यार्थीनिला गणपती तयार झाल्यावर विचारले की, इतकी सुंदर मूर्ती तू कशी तयार केली? त्यावर त्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर उत्तर दिले .सर मातीच्या गोळयात मूर्ति अगोदरच तयार होती. मी फक्त त्या मातीच्या गोळयाला आकार दिला आणि मूर्ती तयार झाली .यावरून लक्षात आले की चिमुकल्या मुलांमध्ये आधीच कलाकार- शिल्पकार दडलेला असतो फक्त त्या शिल्पकाराला संधी मिळाली पाहिजे मग बघा संधीचे सोने कसे होते! हेच या शाळेतील उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाट मोकळी करून दिल्याने सिद्ध झाले.
प्राचार्य मधुकर मोखरे तसेच कला शिक्षक भाऊसाहेब कोते यांचे ग्रामस्थांनी कौतुक करत विदयार्थीरूपी मातीच्या गोळयांना आकार देणारे शिक्षक खरे शिल्पकार असल्याचे गौरोद्गार काढले.