महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात सामूहिक अथर्वशीर्ष पठण !

पुणे दि ०९ महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेचे महिलाश्रम वसतिगृह, बाया कर्वे वसतिगृह, सर ससून डेव्हिड वसतिगृह आणि वृद्धाश्रम विभागातर्फे २०१० पासून १३ वर्षे सलग सामूहिकरित्या अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम सातत्याने चालू आहे. यंदाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी संस्थेच्या इचलकरंजी सभागृहात सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.

संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलच्या संस्कृतच्या शिक्षिका सौ. शुभांगी देशपांडे यांनी याबाबत मार्गदर्शन करुन त्यांच्या सोबत विद्यार्थीनींनी व उपस्थित सर्वांनी अथर्वशीर्ष म्हटले.
आपण सामुहिक अथर्वशीर्षपठण हा कार्यक्रम का घेतो, ते कोणी लिहिले, अथर्वशीर्ष नियमित का म्हणावे इ. ची माहीती आज सुरुवातीला त्यांनी दिली
श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे. ते अथर्व वेदाशी संबंधित आहे.यामध्ये गणेश विद्या सांगितलेली असून, गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्त्व आहे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर.शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय. असा याचा अर्थ लावला जातो. या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रम्हरूप होतो.त्याला कोणत्याच विघ्नाची बाधा होत नाही. .तो सर्व बाजूंनी सुखात वाढतो.हा जप केल्याने विघ्नहर्ता महाविघ्ना पासून मुक्त होतो.तो सर्वज्ञ होतो.
या अथर्वशीर्षाच्या सामुहिक पठणामुळे तसेच एकाग्रतेने म्हटल्याने मुलींची मानसिक एकाग्रता वाढण्यास मदत होते.

गणपतीच्या आरतीने उपक्रमाची सुरवात झाली. यावेळी संस्थेच्या उपकार्याध्यक्षा माननीय विद्याताई कुलकर्णी, सचिव मा. शास्त्री सर, मा. प्रदीप जोशी, श्रीपाद कुलकर्णी, सुमन यादव/तांबे, मंजुषा दौंडकर, मंजुळा देदाळे, पूनम पोटफोडे आणि वसतिगृहातील सेवकवर्ग व सुमारे १२०० विद्यार्थीनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.