अकोले तालुक्यातील क्रांतिकारकांचा इतिहास या विषयावर निबंध स्पर्धेत 1013 विद्यार्थ्यांचा सहभाग

अकोले प्रतिनिधी
क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा दुसरा टप्पा आज पूर्ण करण्यात आला. निबंध स्पर्धेत तालुक्यातील 1013 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
अकोले तालुक्यातील क्रांतिकारकांचा इतिहास या विषयावर आयोजित या निबंध स्पर्धेत सहभागी 1013 निबंध विद्यार्थ्यांनी घरी लिहिले होते. या 1013 निबंधांमधून 11 शिक्षकांच्या परीक्षक मंडळाने 110 उत्तम निबंध निवडले. निवड झालेले हे 110 निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना अकोले येथील किसान सभा कार्यालयात बोलावून हे निबंध प्रत्यक्ष लिहायला लावण्यात आले.
अकोले तालुक्यातील क्रांतिकारकांचा इतिहास विद्यार्थ्यांना माहीत व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय किसान सभा, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्यक्ष लिखाण स्पर्धेत सहभागी पात्र 110 विद्यार्थ्यांमधून 5 निबंध पुरस्कारासाठी निवडले जाणार असून या निबंधांना 3000 रुपये प्रथम, 2000 रुपये द्वितीय, 1000 रुपये त्रितीय व 500 रुपयेचे प्रत्येकी 2 उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ सदागिर, एकनाथ मेंगाळ यांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या प्रत्यक्ष लिखाण टप्प्याच्या आयोजनात ललित छल्लारे, दिपक पाचपुते, भाऊसाहेब कासार, संजय पवार, मधुकर शेटे , राजेंद्र भाग्यवंत, जितेंद्र खैरनार , अजय पवार , विकास पवार , बाळासाहेब शेळके , आदिनाथ सुतार , कुसुम वाकचौरे, प्रतीक्षा उगले, प्रविण मालूंजकर आदींनी सहकार्य केले.
स्पर्धेपूर्वी श्री. भाऊसाहेब चासकर सर यांनी स्पर्धेचा उद्देश, विषय व नियम समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी आपण रहात असलेल्या भूभागाचा इतिहास व भूगोल समजून घ्यावा व त्या आधारे आपला समाजाकडे व जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोण विकसित करावा असे प्रतिपादन केले.
स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा त्यांच्या शाळेत जाऊन सन्मान केला जाणार आहे. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या शिक्षक, पालक व शाळांचे तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे संयोजकांनी आभार व्यक्त केले आहे.