टाकळी शाळेत आदिवासी दिन उत्साहात साजरा

अकोले – आदिवासी सुरक्षित तर जंगल सुरक्षित, जंगल सुरक्षित तर पर्यावरण सुरक्षित,पर्यावरण सुरक्षित तर जग सुरक्षित या संकल्पनेला केंद्रीभूत मानून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देवठाण बीट शिक्षण विस्तार अधिकारी श्री. अनिल गायकवाड उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचा परिचय करून देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी अकोले तालुक्याचे नररत्न आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा विद्यार्थ्यांना जीवनपरिचय करून दिला. सहशिक्षक श्री.संजय देशमुख यांनी आदिवासी जनसमुदायाने जल, जंगल व जमीन रक्षणासाठी केलेले अनमोल योगदान याविषयी मार्गदर्शन केले.
शिक्षण विस्तार अधिकारी श्री. अनिल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना एक पेड माॅं के नाम उपक्रमांतर्गत पर्यावरणाचे संतुलन व आदिम संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगितले. अध्यक्षीय भाषणात श्री. दत्तात्रय देवगिरे यांनी क्रांती दिवस व अकोले तालुक्याचा आदिवासी सांस्कृतिक वारसा याविषयी माहिती दिली. स्वयंसेविका श्रीमती निता लेंभे यांनी सांस्कृतिक कलामंच पथकास मार्गदर्शन केले. सहशिक्षक श्री.संजय शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



