रतनवाडीत राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठ स्तरीय शिबिर संपन्न

विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे रतनवाडी,कळसूबाई-हरिश्चंद्रगड-अभयारण्य येथे स्वच्छ भारत अभियानातून विद्यापीठस्तरीय निसर्ग संवर्धन शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील सर, सचिव मा. डॉ. सोमनाथदादा पाटील, विश्वस्त स्मिता जाधव मॕडम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डाॕ. प्रभाकर देसाई आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
२७ फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत झालेल्या या शिबिरात पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यातून २५९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. रतनवाडीत अमृतेश्वराच्या यात्रेनंतर होणारा कचरा, रतनगडाची व गडाकडे जाणाऱ्या मार्गाची स्वच्छता, सांदन दरी स्वच्छता, वृक्षारोपण इत्यादी कामे शिबिरात विद्यार्थ्यांनी केली. अमृतेश्वराच्या यात्रेनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या भागातील प्रथा आणि संस्कृती अनुभवली. तसेच देवराई आणि या परिसरातील वनस्पतीबद्दलची माहिती प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. दररोज सकाळी योगा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना लाभले. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना आणि युवक याविषयावर प्रा. नामदेव बांगर, प्रा.अनिल डगळे, जैवविविधता संवर्धन या विषयावर जैवविविधता अभ्यासक श्री. मिलिंद बेंडाळे तर पर्यावरण आणि मानव यांचा सहसंबंध या विषयावर प्रा.महेंद्र ख्याडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे सत्यनिकेतन संस्था राजूरचे सचिव प्राचार्य डाॕ. टी.एन. कानवडे, रतवाडीचे माजी सरपंच श्री. पांढरे पाटील, हे होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या शिबिरातून सकारात्मक गोष्टी घेतल्या पाहिजे या शिबिरातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाचा विकास होऊन आत्मविश्वास वाढतो असे मत प्राचार्य कानवडे यांनी व्यक्त केले. पांढरे पाटील यांनीही या भागात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर घेणाऱ्या प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांचे धन्यवाद मानले. अध्यक्षिय भाषणात प्राचार्य डाॕ.मोहन वामन यांनी निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे आणि तेच या शिबिराच्या माध्यमातून केले जाते असे मत मांडले.सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख तर आभार गणेश फुंदे यांनी मानले. तर दररोज सकाळी विद्यार्थ्यांचा व्यायाम आणि योगा प्रा. रोहित वरवडकर यांनी घेतला.
या शिबिराचे नियोजनात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा गणेश फुंदे, रासेयो विभागीय समन्वयक प्रा. डाॕ. मिनल भोसले प्रा. खलिद शेख, प्रा. भागवत देशमुख प्रा. हेमल ढगे, प्रा. मयुर मुरकुटे प्रा. सतिश ठाकर, प्रा. रोहित वरवडकर,प्रा. सौरभ शिंदे यांनी सहभाग घेतला.
या शिबिरासाठी रतवाडी ग्रामस्थ तसेच सौ. वामन मॕडम, श्री. नाथा झडे व दशरथ झडे यांचे सहकार्य लाभले.
.