संत पंढरी श्री क्षेत्र पिंपळगाव वाघा येथे काकनेवाडी ग्रामस्थांचे श्रमदान –

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी,
जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य वारकरी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष कृष्ण कृपाकित डॉ. विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या भव्य मंदिर निर्मिती च्या कार्याला हातभार म्हणून काकनेवाडी च्या ग्रामस्थांनी एक दिवसीय श्रमदान संत पंढरीवर केले.
हा प्रकल्प पंचक्रोशी च्या वैभवात भर घालणारा असून गुरुकुल प्रकल्प हे या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण असणार आहे. गेली अनेक वर्षाची अध्यात्मिक परंपरा काकनेवाडी गावाला आहे आणि याच परंपरेचा वारसा गावातील तरुण पुढे चालवत असल्याचा प्रत्यय पुन्हा आला.
गावातील लहान मुले, महिला, तरुण,जेष्ठ नागरिक सर्व श्रमदानात सहभागी झाले होतेआणि दिवसभर न थकता काम करत होते. या वेळी संध्याकाळी गुरूवर्य डॉ.मिसाळ महाराजांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती ग्रामस्थांना सांगितली. श्रमदान ही शारीरिक कष्टा सोबत, भावनिक संकल्पना आहे. संत पंढरी ही माझी आहे मी येथे श्रम केलेले आहे ही भावना श्रम दानातुन वाढीस लागण्यास मदत होते. काकनेवाडी हे गाव छोटे आहे. पण संत पंढरीच्या प्रत्येक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देणारे आहे. आता पर्यंत गुंठे, देणगी, दगड आणि आता श्रमदान या सर्वात काकनेवाडी गाव अग्रस्थानी असल्याचे सांगून संपूर्ण गावाचे आणि विशेषतः लहान मुलांचे भरभरून कौतुक महाराजांनी केले.
तरुणांनी केलेल्या श्रमदानाच्या आव्हानाला गावातील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. श्रमदानात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार हभप रंगनाथ महाराज वाळुंज यांनी मानले.