फोपसंडी येथील दत्तात्रय मुठे यांना राज्य शासनाचा आदिवासीं सेवक पुरस्कार !

कोतुळ /प्रतिनिधी:
अकोले तालुक्यातील अती दुर्गम फोपसंडी येथील सामाजिक कार्यकर्ते व पर्यटन मार्गदर्शक दत्तात्रय मुठे यांना राज्य शासनाचा सन २०२२-२३ चा आदिवासीं सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण २९ नोव्हेंबर रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना विजयकुमार गावित यांच्या हस्ते नाशिक येथे होणार आहे.
राज्यातील आदिवासी समाजासाठी भरीव योगदान असणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो . कोविड मुळे २०१९-२० पासून या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते त्यामुळे यावर्षी सन २०१९-२०,२०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या चार वर्षाचे एकत्रित पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचां शासन निर्णय २३ नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयान्वये तालुक्यातील सखाराम ठका गांगड, ठकाजी नारायण कानवडे व दत्तात्रय हनुमंता मुठे या तिघांना आदिवासी सेवक पुरस्कारा ने सन्मानित करण्यात येणार आहे.
दत्तात्रय मुठे यांनी अकोले तालुक्यातील अति दुर्गम फोफसंडी येथे बस सेवा सुरू करणे तसेच हे गाव तालुक्याशी जोडण्या साठी रस्ते गावचे वीज, पाणी, दळणवळनाचे प्रश्न सोडवून पर्यटन विकासाचे काम केले.
सातेवाडी परिसरात मोबाईल टॉवर नसल्याने ऑनलाईन शिक्षणास अडचणी येत असल्या ने .दत्तात्रय मुठे यांनी सतत पाठपुरावा करून फोफसंडी सह तीस गावांचा मोबाईल टॉवर चा प्रश्न खा. सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून सोडविला होता.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर केला या पुरस्काराबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.