ग्रामस्वच्छता अभियानात तिगाव व आंबी खालसा ग्रामपंचायती अव्वल स्थानी..

संगमनेर – अहमदनगर जिल्हयात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२२-२०२३ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा राबविण्यात आले. यात आंबी खालसा व तीगाव ग्रामपंचायत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून सन २०००-२००१ पासुन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण जनतेच्या आरोग्यमानाचा दर्जा उंचावणे. स्वच्छतेच्या सवयी अंगिकारुन गजनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर, उंचावण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत आहे.नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिवर्तन व गावागावांमधून सुरु असलेल्या स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेवून ग्रामस्थांना प्रोत्साहित करुन, या कार्यक्रमाचे आपलेपणा व महत्व पटवून देण्याकरीता हे अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिय येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद गट स्तरीय स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी भाग घेतला होता. गट स्तरीय स्पर्धेत सर्वात जास्त गुण प्राप्त करणा-या ९ ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय समितीने केली. त्यानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची निवड केलेली आहे. या अभियानामध्ये संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तिगाव व आंबी खालसा या ग्रामपंचायतींना या अभियानामध्ये उत्कृष्ठ कामगिरीबद्दल जिल्हा स्तरावर अव्वल क्रमांक मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यातील तिगाव या ग्रामपंचायतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अभियानात जिल्हा स्तरीय सहा लक्ष रकमेचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे.
या बाबत सरपंच श्री. ज्ञानेश्वर सानप व ग्रामविकास अधिकारी श्री सतीश गाडेकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग घेवून मग्रारोहयो योजनेतुन अठरा हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवड केली. स्वच्छ भारत अभियानातून दोन सार्वजनिक शौचालये बांधले.सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम उत्तम प्रकारे केले. शाळांमध्ये बोलक्या भिंती रंगविल्या अशा विविध कामांच्या माध्यमातून गावाचा कायापालट केला.
आंबी खालसा ग्रामपंचायतीने घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन या प्रकारात स्व. वसंतराव नाईक जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. बाळासाहेब ढोले व ग्रामविकास अधिकारी श्री विजय आहेर यांनी सांगितले की, ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग घेऊन गावामध्ये विपुल प्रमाणात वृक्ष लागवड केली, गावामधील सांडपाणी व्यवस्थापन उत्तमरित्या केले व त्याचे शुध्दीकरण नैसर्गिक पध्दतीने होईल अशी व्यवस्था निर्माण केली. शाळा, अंगणवाडयाच्या ठिकाणी शोषखडडे खोदून सांडपाणी त्यामध्ये जिरविण्याची व्यवस्था केली. महिलांना सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्याची व्यवस्था केली . त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा बसविली. गावामध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविल्यामुळे लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीवजागृती झाली . गाव स्वच्छ राखण्यात फार मदत झाली त्यामुळेच हा विशेष पुरस्कार मिळाला असल्याचे सांगितले.
या प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची तपासणी विभागस्तरीय तपासणी समितीकडून करण्यात येणार आहे.याकामी विस्तार अधिकारी राजेंद्र ठाकूर, राजेंद्र कासार , सदानंद डोके यांनी विशेष प्रयत्न केले.
नागरिकांच्या सहकार्याने अभियान यशस्वी..नागणे
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा व तीगाव ग्रामपंचायतीने मिळवलेले यश हे नागरिक व प्रशासन यांच्या सहकार्याने हे यश मिळाले आहे.स्वच्छते बाबत अधिक चांगला दृष्टीकोन ठेवून काम केल्यामुळे लोकांची मानसिकता बदलत आहे.पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम राबवण्यात अधिक चांगले प्रयत्न झाले आहे.व्यापक पातळीवर बदलाच्या दिशेने चांगले काम झाले आहे.त्यामुळे यश मिळाले आहे.
अनिल नागणे,
गटविकास अधिकारी, पंचायत समिती संगमनेर