अभिनेता शशांक केतकर च्या उपस्थितीत महिलाश्रम वसतिगृहात भरारी २०२४ संपन्न

पुणे – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहातील भरारी-२०२४ या हॉस्टेल डे कार्यक्रमासाठी अभिनेता शशांक केतकर यांनी हजेरी लावल्याने मुलींचा उत्साह द्विगुणीत होऊन त्यांनी जल्लोषात कार्यक्रम साजरा केला.
यावेळी मुलींशी संवाद साधताना केतकर म्हणाले, की माझी आई संस्थेची माझी विद्यार्थिनी आहे आणि आईच्या शाळेत जायला मिळणार म्हणून मी हे निमंत्रण आनंदाने स्वीकारले. त्याचबरोबर शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वावलंबन याचे महत्त्व मुलींना सांगितले. संस्था मुलींच्या शिक्षणासाठी करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. केसवर्कर कुमुदिनी पाठक यांनी त्यांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाआधी केतकर यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णांच्या समाधीस्थळाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी संग्रहालयाला भेट देऊन अण्णांच्या कार्याची माहिती घेतली.
वसतिगृहप्रमुख सुमन तांबे यांनी प्रास्ताविकात वसतिगृहातील उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, अतिरिक्त विशेष कार्यअधिकारी प्रदीप जोशी यावेळी उपस्थित होते. वसतिगृहात चालणाऱ्या उपक्रमांना सेवाभावी वृत्तीने मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा व व्यक्तींचा यावेळी केतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रतिनिधींचा परिचय उपप्रमुख पूनम पोटफोडे यांनी करून दिला. वसतिगृहात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचारी वंदना सस्ते (मेट्रन), सुरेखा सावंत (स्वयंपाकघर), कावेरी चव्हाण (मदतनीस) यांचा संस्थेचे कार्याध्यक्ष देव यांच्या हस्ते वत्सल स्मृती पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर देव यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. प्रणाली भोसले, भाग्यश्री लडकत, श्रुती मोरे, अक्षरा वनकर, सृष्टी शिंदे यांनी वसतिगृहातील अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमृता गोविंद दौंडकर, तनुजा अशोक भुजवणे भाग्यश्री रामदास मानकर या विद्यार्थीनींनी केले. रुख्मिणी बागूल यांनी आभार मानले. आश्रमगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.