.सर्वोदय विदया मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

.
स्वराज्य निर्माण करणे लढवय्यांचे ते विश्वसौंदर्य होते- प्रा.संतराम बारवकर
अकोले प्रतिनिधी
अवघड आहे,कठिण आहे,म्हणून सोडून दिले असते,तर शिवरायांचे स्वराज्य कधीच उभे राहिले नसते.स्वराज्य निर्माण करणे हे काही येरागबाळयाचे कामच नव्हते,ते शुरविरांच्या धाडसाचे,पराक्रमाचे,स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देऊन पिढ्यान पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या लढवय्यांचे ते विश्वसौंदर्य होते.असे प्रतिपादन प्रा. संतराम बारवकर यांनी केले.
सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रा.बारवकर विचार मंच्यावरून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक सदाशिव गिरी हे होते.याप्रसंगी व्यासपिठावर प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,साई कम्प्युटरचे संचालक दीपक माने,बीना सावंत, संतोष कोटकर,बाळासाहेब घिगे,वंदना सोनवणे,रावसाहेब पांडे, श्रीकांत घाणे, नानासाहेब शिंदे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी उपस्थित होते.
प्रा.बारवकर यांनी पुढे मार्गदर्शन करताना असे म्हणाले की, मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपला शेवटचा श्वास पणाला लावला होता.प्राणांची बाजी लावली होती.पराक्रमाची शिकस्त केली होती. येणाऱ्या संकटांना न घाबरता महाराजांच्या युक्ती आणि बुद्धीच्या जोरावर एकजूटीने सामना केला.धावपळीच्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.परंतु त्याआधीच जिजाऊंच्या मेंदूत स्वराज्याचा जन्म झाला होता.सुलतानशाहीच्या जुलमी अत्याचाराच्या विरोधात बंड पुकारून दु:खी,कष्टी जनतेसाठी काही करण्याची इच्छा माँ जिजाऊंनी शिवबात पेरली.यासाठीच तमाम मावळ्यांनी फौज उभी करण्यात आली होती.इथे जातीपातीचा विचार नव्हता. त्यांचे केवळ एकच ध्येय होते स्वराज्य.
स्वराज्याबरोबरच उदयोगधंदयांना संरक्षण दिले.संरक्षण दिले तर राष्ट्र प्रगतीपथावर जाईल ही प्रेरणा प्रत्येक सैनिकात निर्माण केली.असे विचार व्यक्त करत अफजलखान वध,दक्षिण दिग्वीजय,शिवाजी राज्याभिषेक या विषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव गिरी यांनी शिवरायांसाठी जगायचे व स्वराज्यासाठी मरायचे याप्रमाने स्वराज्यासाठी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.प्रजेला सुख मिळणे हा उद्देश साध्य करने ही माँ जिजाऊंची शिकवण महत्त्वाची होती.शिवाजी महाराजांनी सर्व जातींच्या लोकांना मावळ्यांच्या नावाने संघटित केले.म्हणून शिवाजी राजे देशाचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचे राजे होते.असे विचार व्यक्त केले.
इयत्ता ५वीची विद्यार्थीनी रसिका शिंदे हिने आपले विचार व्यक्त केले.
यावेळी दहावीच्या विदयार्थ्यांनी श्रीरामाची प्रतिमा तर दीपक माने यांनी भारतीय संविधानाची प्रतिमा भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे यांनी शिवाजी महाराजांचा पाळणा सादर केला.
सुत्रसंचलन राजेविनोद साबळे यांनी केले.तर महेश दिंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
