मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताची पारनेरमध्ये जंगी तयारी!

पन्नास जेसीबीतून होणार पुष्पवृष्टी
दत्ता ठुबे
/पारनेर,प्रतिनिधी
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.येथील ऐतिहासिक बाजारतळावर शनिवारी,२३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी तालुक्यातील विविध गावांमधून नियोजन केले जात आहे.
दरम्यान राज्याच्या विविध भागात जरांगे यांच्या सभांना परवानगी मिळत नसल्याने आयोजक चिंतेत होते.मात्र पोलीस प्रशासनाने सभेला परवानगी दिल्याने आयोजकांचा उत्साह वाढला असून सभेच्या तयारीला वेग आला आहे.
जरांगे यांच्या स्वागताची जंगी तयारी सुरू आहे.तब्बल ५० जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
त्यासाठी १ टन फुले मागवण्यात
आली आहेत.वडझिरे येथील समाज बांधवांनी गुलाबाच्या फुलांची वृष्टी करण्याचे नियोजन केले आहे.
त्याचबरोबर क्रेनच्या साहाय्याने जरांगे यांना ५१ फुटांचा गुलाब पुष्पांचा हार घालण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बाजारतळावरील स्थायी स्वरूपाच्या व्यासपीठाच्या रंगरंगोटीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.प्रत्येक जिल्हा परिषद गटात वाहनांवर बसवलेल्या ध्वनीक्षेपकावरून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.गावागावात सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत.
जरांगे यांच्या लाखो समाज बांधवांच्या उपस्थित झालेल्या सभा, तसेच मुंबई मोर्चा कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेत पार पडला. आहे.सनदशीर मार्गाने,शांततेत होणाऱ्या मराठा आंदोलनाची परंपरा पाळण्याची जबाबदारी प्रत्येक समाज बांधवावर आहे.त्यामुळे सभेला गालबोट लागेल असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहन करतानाच मराठा बांधव शिस्तीचे दर्शन घडवतील असा विश्वास पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
तालुक्याच्या विविध गावांतून येणाऱ्या वाहनांसाठी शहरात येणाऱ्या चारही रस्त्यांवर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.पानोली रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयाजवळ,अळकुटी व कान्हूर रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी मणकर्णिका लॉन्स,सुपे रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी क्रीडा संकुल तर जामगाव रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी केके हॉटेलजवळ वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त
जरांगे पाटलांच्या सभेसाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.पोलीस अधिकारी ०५,पोलीस अंमलदार ५०,महिला पोलीस अंमलदार १०,वाहतुक पोलीस अंमलदार ०५,स्थानिक गुन्हे शाखा (साध्या वेशात) १०,स्ट्रायकिग फोर्स ०१.असे बंदोबस्ताचे नियोजन आहे.
सभेसाठी येणाऱ्या समाजबांधवांनी सोन्याची चेन,ब्रेसलेट,मोठी रक्कम जवळ बाळगू नये.आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक समिर बारवकर यांनी केले आहे