समशेरपूर येथील एटीएम फोडणारी टोळी गजाआड पाच जणांना अटक एक फरार.
अकोले: मागील आठवड्यात अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे एक एटीएम फोडल्याची घटना घडली होती यात लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली होती. हा गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अकोले पोलीस यांनी या घटनेचा समांतर तपास केला, यामध्ये अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सहा जणांची नावे समोर आली आहेत. यामधील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून फोडलेले एटीएम, एक गाड़ी, मोबाईल, रोख रक्कम असा ७ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांना मिळालेली गोपनिय माहिती आणि तपास यंत्रणेतील काही टेक्निकल गोष्टी यांच्या आधारे हा गुन्हा उघड झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी रात्री काही व्यक्तींनी समशेरपूर येथील बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम उखडून नेले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. गुन्हा दाखल होताच अकोले पोलीस निरीक्षक विजय करे आणि पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आणि तपासाला गती दिली होती. बाच दरम्यान एटीएम फोडीच्या घटनेचे गाभिर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी देखील तांत्रिकदृश्या तपासाची चक्रे नगरहून हालविली. त्यानंतर मोबाईल लोकेशन, आरोपींच्या हलचाली, सीसीटीडी फुटेज आणि पोलिसांचे सोर्स यांचा आधार घेऊन आरोपी पेट पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
एटीएम फोडणे हे त्यांचे पूर्वनियोजित होते. यातील मास्टर माइंड म्हणून भरत गोडे होता. आवाज होऊ नये म्हणून गाडीने एटीएमला दोर बांधून गाडीने ओढून एटीएम उखडून ते म्हसवड बळणाच्या घाटातून एकदरी गावाच्या परिसरात नेले. तेथे त्यांनी गॅसकटरने ते कापले. आणि प्रत्येकाने ती वाटून घेतले. घेतले. त्यानंतर ते मशिन त्याच परिसरात फेकून दिले.
दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विजय करे आणि भुषण हाडारे यांनी समशेरपूर, ठाणगाव, दहाकारी, तिरडे, पाचपडा, सिन्नर अशा भागात आपली यंत्रणा कामाला लावली होती, तर, काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांची देखील विचारपूस केली. तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी काही टेक्निकल बाबी तपासल्या, पोलिसांच्या गोपनिय सुत्रांकडून काही माहिती मिळाली आणि स्थगुशाचे पथक थेट अकोल्यात दाखल झाले. यातील आरोपी भरत लक्ष्मण घोडे हा तिरडे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, हे पथक सदरस्थळी पोहचताच त्यांना एकाच ठिकाणी पाच आरोपी मिळून आले. त्यांना काही समजण्याच्या आत पोलिसांनी त्यांच्यावर झडप मारली आणि प्रत्येकाला त्यांची नावे विचारली. एटीएम फोडीबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी घटनाक्रम सांगितला.
आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल, गाडी, गॅसकटर, ऑक्सिजन सिलेंडर असा ७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण घोडे (वय २३), अशोक रघुनाथ घोडे (वय २५) भरत लक्ष्मण घोडे (वय २४) (सर्व रा. तिरडे, ता. अकोले, जि. अ.नगर), सुयोग अशोक दवंग (वय २०, रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) आणि अजिंक्य लहाणू सोनवणे (वय २१, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर, यातील आणखी एक आरोपी गणेश लहु गोडे (रा. तिरडे, ता. अकोले) हा पसार असून अशा सहा जणांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.