रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मानवत (परभणी) तहसीलवर धडकला हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ‘एल्गार मोर्चा’ …

कापूस-सोयाबीन प्रश्नी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलनाचा भडका उडेल – रविकांत तुपकर
परभणी प्रतिनिधी
– कापसाला सध्या चांगला भाव मिळत नसल्याने कापूस साठवणूकीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. राज्यात सध्या 70 % कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिनिंगही बंद आहेत. कापसाच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. आज 23 जाने रोजी मानवत (जि.परभणी) येथे ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांतभाऊ तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्तावर उतरून आपला संताप व्यक्त केला. यामोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांचे याप्रश्नी सातत्याने आंदोलने व पाठपुरावा चालू आहे…आज मानवत येथे रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. केंद्र सरकारने तात्काळ सोयाबीन-कापूस प्रश्नी गंभीर व्हावे, कापूस,सूत व सोयापेंडीच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावे,तसेच सोयाबीन-कापसाला खाजगी बाजारात चांगला स्थिर भाव मिळावा यासाठी ठोस धोरण राबवावे, अन्यथा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आंदोलनाचा राज्यभर आगडोंब उसळेल, असा गंभीर इशारा देत रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

यावेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे,भगवान शिंदे,भास्कर खटिंग, डिगांबर पवार, गजानन तुरे, रामप्रसाद गमे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या मोर्चाचे उत्कृष्ट आयोजन किशोर ढगे यांच्या नेतृत्वात विठ्ठल चोखट, हनुमान म्हसलकर, दत्ता पऱ्हांडे, अशोक काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केले होते.
