अकोल्यात माळीझाप येथील हरिनाम सप्ताहाची सांगता!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील माळीझाप येथील संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा अखंड हरिमान सप्ताहाची सांगता ह.भ.प. बिराजदार महाराज यांच्या किर्तनाने झाली.
ह.भ.प. बिराजदार महाराज यांनी किर्तनात सांगितले कि सावता महाराजांची शेतमळ्यातील निष्ठा, प्रेम, आपुलकी हा त्यांचा एकप्रमाणे जीव प्राण, श्वास होता. यातुन त्यांचे नामस्मरणावरील निष्ठा व श्रद्धा व्यक्त होते. भक्ती आणि अध्यात्म, कर्तव्य कर्म तसेच सदाचारी भाव यांची यथोचित मोट खर्या अर्थाने सावता महाराजांनी बांधली. दांभिकपणा, अवडंबर, अंधश्रद्धा याबाबतीत महाराजांनी स्वतः आचरणातुन प्रखर विरोध त्याकाळी नोंदविला.

यशोदामाय कृष्णा च्या खोड्या, त्याचे सवंगडी त्यांचा तेथे विट्टी-दांडु इतर खेळ . सगळ्यांच्या शिदोर्या एकत्र करून केलेला काला याचे दाखले देत महाराजांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले.
ह.भ.प. गोरक्ष महाराज वेलजाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहभर दररोज विविध दैनंदिन धार्मिक कार्यक्रम व नामयज्ञाने पंचक्रोशीचे वातावरण धार्मिक बनले होते. सप्ताहाचे सांगते वेळी अकोले शहरातुन संत सावता महाराज प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली. सांगता समारंभास माळीझाप, गुरवझाप, नवलेवाडी, औरंगपुर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.