रोटरीचे कार्य कौतुकास्पद: डॉ. सुहास पारीख

नाशिक : रोटरी फाउंडेशनच्या वतीने मुंबईचे अनुभवी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सुहास पारीख यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या रोटरी-मॅग्नम हॉस्पिटलच्या कॅथ लॅबला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी सामाजिक क्षेत्रात रोटरीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
मॅग्नम हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रोटरी फाउंडेशन यांच्या आर्थिक सहकार्याने दोन वर्षांपूर्वी कॅथ लॅब स्थापन केली होती. त्याच्या पाहणीसाठी आलेल्या डॉ. सुहास पारीख यांनी रोटरी क्लबच्या विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडिया यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. सुहास पारीख यांनी त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात रोटरी क्लब नाशिकच्या नियोजित रोटरी चौक, रोटरी-नेल्सन हॉस्पिटल निओनॅटल लॅब, रोटरी वात्सल्य मिल्क बँक, रोटरी रुग्ण साहित्य सेवा, रोटरी स्किन बँक, रोटरी हॉल इत्यादी ठिकाणी भेट देत रोटरीचे सर्व क्षेत्रातील कार्य पाहून रोटरीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. रोटरीचे ज्येष्ठ संचालक रवी महादेवकर, सचिव ओमप्रकाश रावत, विजय दिनानी, डॉ. श्रीया कुलकर्णी, मुग्धा लेले, मंगेश अपशंकर, शिल्पा पारख, प्रणव गाडगीळ, सतीश मंडोरा, डॉ. रामनाथ जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
जवळपास सहा हजार बायपास केलेल्या आणि शंभराहून अधिक हार्ट ट्रान्सप्लांट केलेले डॉ. सुहास पारीख हे रोटरी क्लब ऑफ मुंबई डाऊनटाऊनचे माजी अध्यक्ष आहेत. रोटरी फाउंडेशनच्या वतीने पाहणीसाठी त्यांचा हा दौरा होता. यावेळी डॉ. मनोज चोपडा, डॉ. मंदार वैद्य, अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया यांनी विविध प्रकल्पांची माहिती त्यांच्यासमोर सादर केली.