पारनेर विधानसभे साठी राणीताई लंके आमदारकीच्या तयारीत ?

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :-
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विखे विरोधातील टफ फाइटमध्ये नीलेश लंकेंनी विखेंना चितपट केले. कसे झाले? कसे काय झाले? याचं विश्लेषण भाजप, विखे आणि त्यांचे विखे यंत्रणा करत आहे. लोकसभेच्या मैदानात नीलेश लंके यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांचे नाव आता पारनेर विधानसभेसाठी चर्चेत आहे. राणीताई निलेश लंके या राष्ट्रवादी शरद पवार
साहेबांकडून की, राष्ट्रवादी अजितदादांकडून आमदारकीसाठी मैदानात असतील, याची चर्चा आहे. तसेच राणी लंके आमदारकीसाठी मैदानात आणणे म्हणजे, विखे यांच्या राजकीय घराणेशाहीचा कित्ता लंके गिरवत असल्याचीही चर्चा आहे.
नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांचा विजय झाल्यानंतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्वच राजकीय गणिते बदललीत. खासदरकीच्या निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी नीलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवार यांची तुतारी हातात घेतली. आमदारकीचा राजीनामा दिला.
नीलेश लंके यांच्या या निर्णयावर अजितदादांनी चांगलेच संतापले होते. नीलेश लंके यांनी काही काळ राज्यातच काम करावे, असा सल्ला दिला आहे. काहींच्या नादी लागून तो स्वतःचे राजकीय करिअर धोक्यात आणतो आहे, असे म्हणत नीलेश लंके यांना फटकारले होते. नीलेश लंके यांनी मात्र अजितदादांना कोणतेच प्रत्युत्तर न देता संयम दाखवला. लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच, शेवटच्या टप्प्यात अजितदादांनी कर्जत- जामखेड आणि पारनेर मतदारसंघात विखे यांच्या समर्थनार्थ सभा घेतल्या. पारनेर नीलेश लंके यांचे होमग्राउंड, त्यामुळे तेथे अजितदादा काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. अजितदादांनी लंके यांच्या होम ग्राऊंडवर निलेश लंके यांच्या विरोधात जोरदार फटकेबाजी केली. बेट्या,तू ज्या शाळेत शिकला आहे, त्या शाळेचा मुख्याध्यापक आम्ही आहोत,असे म्हणत निलेश लंके यांना सुनावले. गुंडगिरी, दहशत मोडून काढा,असे आवाहन केले.
सभेत निलेश लंके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली होती. राम कृष्ण हरी,गाडा तुतारी,अशा घोषणा दिल्या गेल्या. लंके यांनी येथे देखील संयम दाखवला. नेते आहेत, विरोधात भाषण करावेच लागते,असे म्हणत अजितदादांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले.
निलेश लंके आता खासदार झाले आहेत. आमदारकीच्या राजीनाम्यानंतर पारनेर विधानसभेची जागा रिक्त आहे. लंके यांच्या विजयानंतर नगर दक्षिणमधील राजकीय गणिते बदलली आहेत. आगामी विधानसभेच्या जागा वाटपात काय निर्णय होईल, याकडे लक्ष लागले आहे. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. घड्याळ चिन्हावर निवडून आले होते. पक्षफुटीनंतर ते अजितदादांकडे गेले. खासदारकी साठी ते शरद पवारांकडे आले. आता पारनेरच्या जागेवर दोन्ही पवारांचा डोळे असणार आहे. यातच निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचे नाव आता आमदारकीसाठी चर्चेत येऊ लागले आहे.
राणी लंके या शरद पवार की, अजितदादा गटाकडून आमदारकी लढवणार ? अशी चर्चा आहे. विधानसभेसाठी शरद पवार ही जागा लढल्याशिवाय राहणार नाहित तर, अजितदादा पारनेरवरील दावा सोडणार नाहित. त्यामुळे पारनेर विधानसभेत पुन्हा पवार विरुद्ध पवार,असा संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल. विधानसभेसाठी राणीताई लंके यांच्याबाबत निलेश लंके काय निर्णय घेणार, याकडे देखील लक्ष लागले आहे. राणी लंके आमदारकीच्या मैदानात आल्यास निलेश लंके हे विखे यांच्या राजकीय घराणेशाहीचा कित्ता गिरवतील, अशी देखील चर्चा आहे.