अकोल्यात मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण १३२ दिव्यांगांनी केले घरात बसून मतदान

अकोले प्रतिनिधी
शिर्डी लोकसभेच्या निवडणुकी साठी अकोले विधानसभा मतदारसंघात प्रशासनाची निवडणूक मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथाउपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
३०७ मतदार केंद्रांवर १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. २ हजार मतदान कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील १९२ गावे २५६ मतदान केंद्र आणि संगमनेर तालुक्यातील ३२ गावे ५१ मतदान केंद्र अशी एकूण २२४ गावे ३०७ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
१९ मतदान केंद्रांवर कोणत्याही मोबाइल फोन कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. त्या ठिकाणी पोलिस विभागाकडून वॉकीटॉकी सुविधा उपलब्ध करून दिली असून प्रत्येक केंद्रावर दोन दोन रनर नियुक्त केले आहेत. यात अंबीत शिसवद, लव्हाळीओतूर, फोपसंडी, खेतेवाडी, खांडगेघर म्हसवंडी सांगवी, सांगवीची दगडवाडी, देवगाव, लाडगाव, पांजरे, साम्रद, रतनवाडी, चिंचवणे, तेरुंगण, कुमशेत, पेठेचेवाडी, पाचनई, या गावांचा समावेश आहे
मतदारसंघात १०१ मतदान केंद्र अकोले मुख्यालयापासून ४० किमीपेक्षा जास्त अंतरावर असून त्यापैकी ५४ मतदान केंद्र ५० किमीपेक्षा जास्त अंतरावर आहेत. मतदान अधिकारी व मतदान यंत्रांच्या वाहतुकीसाठी ३२ एसटी बसेस, २० स्कूल बसेस, ५६ जीप यांचा वापर केला जाणार आहे.
: शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी अकोले तालुक्यातील १३२ दिव्यांग व्यक्तींनी तर लिंगदेव येथील १०२ वर्षे वयाच्या भागीरथीबाई लक्ष्मण कानवडे यांनी घरात बसून मतदान करत मतदानाचा हक्क बजावला.
अकोले तालुक्यातील दिव्यांग व ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्या मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदान करणे शक्य नाही, आशा मतदारांचा सर्व्हे करून १४१ मतदार यांना घरूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
त्यापैकी २१ दिव्यांग व १११ वृद्ध मतदारांनी
घरूनच मतदानाचा हक्क बजावला, यासाठी आठ पथके नियुक्त करण्यात आली होती. ७ व ८ मे रोजी गृहभेटी द्वारे हे मतदान करून घेण्यात आले.
अकोले तालुक्यातील ६८ महसुली गावांतून या १४१ वृद्ध व दिव्यांग मतदारांना ही सुविधा देण्यात आली होती. तथापि त्यातील ५ मतदार मयत झाले आहेत. ४ मतदार त्याच्या घरी उपस्थित नसल्याने
त्यांचे मतदान होऊ शकले नाही. उर्वरित १३२ वृद्ध व दिव्यांग मतदारांनी या सुविधेचा लाभ घेतल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले