महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची अनोखी भेट!

…आणि ‘ राहीबाई ‘चा हुंदका दाटून आला!
विलास तुपे
राजूर प्रतिनिधी..
राहीबाई भांगरे व त्यांची सावत्र मुलगी सीताबाई सुपे या वृध्द मायलेकी अनेक दिवसांपासून हक्काच्या पेन्शन पासून वंचित होत्या. याबाबत वृत्तपत्रातून माहिती मिळाल्यावर अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी काल ७ मार्च २०२२ ला अचानकपणे बांगरवाडी ता अकोले येथे त्यांची भेट घेत आपुलकीने व आस्थेवाईकपणे संवाद साधला. जिल्हाधिकारी यांनी आपुलकीने साधलेल्या संवादामुळे राहीबाई भांगरेच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत अकोले तहसीलदार सतिश थिटे, नायब तहसीलदार गणेश माळवे उपस्थित होते. याप्रंगी जिल्हाधिकारी यांनी राहीबाई यांना तब्येत कशी आहे ? घरकुल हवे आहे का ? असे प्रश्न करत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी यांच्या अनपेक्षित भेटीनं व विचारपूस केल्यानं राहीबाईंचा हुंदका दाटून आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी त्यांना द्राक्षे ही भेट दिले.
बांगरवाडी येथील भेटीनंतर जिल्हाधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनबाबत अकोले तालुका प्रशासनाची बैठक घेतली. तहसील कार्यालयाने यापुढे ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळत आहे का ? याची नियमित चौकशी करावी. ज्येष्ठ नागरिकांची परस्पर पेन्शन लाटणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करा. यापुढे ज्येष्ठांची फसवणूक होणार नाही. यांची दक्षता प्रशासनाने घ्यावी. असा आदेश ही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिला.