आ. नीलेश लंके यांची महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठक

दत्ता ठुबे /पारनेरप्रतिनिधी
पारनेर-नगर मतदारसंघातील वीजेच्या विविध समस्या पुढील काही दिवसांत मार्गी लावण्याची ग्वाही महावितरणचे कार्यकारी अभियंता लहामगे यांनी दिली.
पुणेवाडी परीसरातील वीजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणेवाडी येथे सब स्टेशन मंजुर करण्यात आले असून त्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही हे काम तात्काळ सुरू करण्यासंदर्भात आ निलेश लंके यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी केली. त्यावर हे काम येत्या काही दिवसांत सुरू करण्याचे कार्यकारी अभियंता लहामगे यांनी मान्य केले. अळकुटी येथे अतिरिक्त पॉवर फिडर मंजुर करण्यात आले आहे. हे कामही सुरू करण्याबाबत लहामगे यांनी सकारात्मक भुमिका घेतली. पळवे बुद्रुक येथे सब स्टेशन उभारून या परीसरातील वीजेचा प्रश्न दुर करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या सबस्टेशनच्या मंजुरीबाबत वरीष्ठांना अहवाल पाठविण्यात येईल असे अधिका-यांनी स्पष्ट केले. पिंपळगांव रोठा व नांंदूरपठार या भागात आठ दिवसांत केवळ 4 दिवस वीज असते. त्यासाठी एसीएफ फंडामधून निधी उपलब्ध करून फिडरचे काम करण्यात यावे कारण एसीएफ फंडामधून ए जी फंडाची सर्वाधिक वसुली पारनेर तालुक्यातून झाल्याचे आ. लंके यांनी अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले.
तालुक्यातील घरगुती मिटरचे रिडींग वेळेवर घेतले जात नसल्याने ग्राहकांना 30 ते 40 हजार रूपये बिले येत आहेत. सबंधित एजन्सीला वेळेत रीडींग घेण्याबाबत ताकीद देण्याची मागणी यावेळी आ. लंके यांनी केली. त्यावर सबंधितांना सुचना देण्याचे मान्य करण्यात आले. कोहकडी येथे घोगडे मळयात नवीन रोहित्र बसविण्यात यावे ही मागणी यावेळी करण्यात आल्यानंतर या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेउ असे कार्यकारी अभियंता लहामगे यांनी सांगितले. पानोली, सोबलेवाडी, नारायणगव्हण येथील रोहित्र मंजुर आहेत त्याची कामे कधी सुरू होणार असा प्रश्न आ. लंके यांनी उपस्थित केल्यानंतर या कामांनाही गती देण्याचे मान्य करण्यात आले. दुरूस्तीचे काम करणा-या एजन्सी वेळेवर काम करीत नाहीत, ही कामे सुरळीत करण्यात यावीत, जळालेली रोहित्रे वेळेवर बदलून मिळावीत अशी मागणीही यावेळी आ. लंके यांनी केली.
नगर तालुक्यातील घोसपुरी, घोडकेवाडी, निंबळक, पिंळपाटी, चिंचोला वस्ती, खारे कर्जुने येथे रोहित्र बसविणे आदींबाबतही आ. लंके यांनी यावेळी मागण्या केल्या. यावेळी महावितरणचे ठाकूर, नवले तसेच अळकुटीचे माजी सरपंच बाबाजी भंडारी, अंकुश शेळके, महेश शिरोळे, बाळासाहेब पुंडे, सावकार शिरोळे, मधुकर जाधव, मारूती म्हस्कुले, जावेद कुरेशी गणेश जाधव, बाबाजी शिरोळे यांच्यासह विविध गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.