दुग्ध विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात दूध भावा साठी प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा !

300 पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स रॅलीमध्ये सहभागी
शेण ओतून केला सरकारचा निषेध
अकोले प्रतिनिधी
दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे गेले 18 दिवस शेतकरी बेमुदत सत्याग्रहाला बसले आहेत. आंदोलनाच्या आठव्या दिवशी मागण्यांची दखल न घेतल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाब पॅटर्नचे अनुकरण करत शेकडो ट्रॅक्टर एकत्र करून आज जबरदस्त रॅली काढली. कोतुळ ते संगमनेर 55 किलोमीटर अंतर पार करत 300 पेक्षा जास्त ट्रॅक्टर आज संगमनेर शहरात धडकले. दुग्ध विकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात दूध भावा साठी प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा निघाला !
अकोले येथे पोलीस प्रशासनाने ट्रॅक्टर रॅली अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र संगमनेरला जायचेच यावर आंदोलन ठाम राहिले. अखेरीस पोलीस प्रशासनानेही आंदोलनांच्या मागण्यांची तीव्रता लक्षात घेता व आंदोलकांच्या भावना लक्षात घेता रॅलीस सहकार्य केले. संगमनेर येथील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टरची लांबच लांब रांग उभी करत आंदोलकांनी शासकीय कार्यालयासमोर दूध ओतून व ट्रॉली भर शेण ओतून आपला संताप व्यक्त केला. दुधाच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या नगर जिल्ह्यात दुग्धविकास मंत्री राहतात. आंदोलनाच्या आठव्या दिवसानंतर सुद्धा त्यांनी आंदोलनाची पुरेशी दखल घेतलेली नाही याबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केल्या. कोतुळ वरून 300 पेक्षा जास्त ट्रॅक्टर ५५ किलोमीटरचे अंतर पार करीत संगमनेरला येऊ शकतात तर अशीच ट्रॅक्टर रॅली लोणी पर्यंत ही निघू शकते किंबहुना अकोले, संगमनेर व नगर जिल्ह्यातील सर्व संघटना व आंदोलकांना एकत्र करत ट्रॅक्टर रॅलीचा एल्गार मंत्रालयालाही धडक देऊ शकतो. सरकारने ही वेळ शेतकऱ्यांवर आणू नये अशा प्रकारची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.
संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. आजच्या आंदोलनानंतरही कोतुळ येथे सुरू असलेले बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असून आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी जिल्हाभरातील सर्व कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पुढील कृती ठरवण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले विनोद देशमुख, सदाशिव साबळे अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव,योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार, आदींनी केले.
अमित भांगरे, संदीप शेणकर, गुड्डू शेटे, नितीन नाईकवाडी, महेश नवले, शुभम आबंरे, दत्ता ढगे, सागर वाकचौरे, संदीप दराडे, आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
संगमनेर तालुक्याच्या वतीने बाबा ओहोळ यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला. चिखली या ठिकाणी दूध वाटून तर धांदरफळ या ठिकाणी केळी व नाश्ता वाटून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी आंदोलनाप्रती आपली सद्भावना व्यक्त केली.