धार्मिक

सावता महाराजांनी कामातच देव पाहिला -आकाश महाराज फुले

नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथी साजरी


अहमदनगर /प्रतिनिधी

नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात संत सावता महाराज पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सावता महाराज तरुण मंडळ, माळी समाज व नेप्ती ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले.


बुधवार (दि.31 जुलै) ते शनिवार (दि.3 ऑगस्ट) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहात सायंकाळी 5 ते 7 या वेळात हरिपाठ व सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कीर्तन झाले. या किर्तनाला हरीहरेश्‍वऱ वारकरी शिक्षण संस्था इसळक व नेप्ती भजनी मंडळ यांची साथसंगत होती. बुधवारी भाग्यश्रीताई महाराज शिंदे केडगाव यांचे कीर्तन झाले.

गुरुवारी (दि.1 ऑगस्ट) महादेव महाराज घोडके घोसपुरी यांचे कीर्तन झाले तर शुक्रवारी (दि.2 ऑगस्ट) रोजी सायंकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून भव्य दिंडी मिरवणुक सोहळा काढण्यात आली होती. या धार्मिक सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 7 वाजता वाजता तुळशीराम महाराज लबडे भातोडी यांचे कीर्तन झाले.


शनिवारी (दि.3 ऑगस्ट) सकाळी 9:30 वाजता शिवचरित्रकार आकाश महाराज फुले यांचे काल्याचे किर्तन झाले. आकाश महाराज फुले म्हणाले की, कांदा मुळ्यांची शेती फुलवून खरा भक्ती मार्ग दाखविणारे संत सावता महाराजांचे कार्य महान आहे. त्यांनी जीवनात कर्माला महत्त्व दिले. कामातच त्यांनी देव पाहिला. पंढरपूरला ते गेले नाहीत, मात्र त्यांच्या भक्तीने साक्षात पांडुरंग त्यांना भेटावयास आले. कर्तव्य, कर्म करीत राहणे ही एक प्रकारे ईश्‍वरी सेवा असल्याचा संदेश त्यांनी दिला. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button